तोयबा’ दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. हल्लेखोरांनी आफ्रिदीवर अनेक गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या तुफान वर्षावामुळे हल्ल्यादरम्यान त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आफ्रिदी हा ‘लष्कर-ए-तोयबा’ कमांडर हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता. खैबर पख्तुनख्वा प्रदेशातील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या कारवायांमध्ये आफ्रिदीला एक महत्त्वाचा दुवा मानले जात होते. तपास यंत्रणांनी त्याच्या मृत्यूला ‘लक्ष्यित हत्या’ म्हणजेच एक पूर्वनियोजित कट मानले आहे.
2023 पासून पाकिस्तानात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे. 2023 मध्ये सात महिन्यांत सात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मारले गेले. याशिवाय, 2026 च्या पहिल्या चार महिन्यांत, लाहोर, कराची आणि इतर शहरांमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांशी संबंधित किमान 30 दहशतवाद्यांना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लक्ष्य केले. शेख युसूफ आफ्रिदीची हत्या ही गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हत्यांच्या मालिकेचा एक भाग आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानमधील लाहोर येथे एका टीव्ही स्टेशनबाहेर ‘लष्कर-ए-तोयबा’चा संस्थापक सदस्य आणि ‘वॉन्टेड’ असलेला दहशतवादी अमीर हमजा याला एका अज्ञात बंदूकधाऱ्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात 67 वर्षीय हमजा गंभीर जखमी झाला होता. ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख मौलाना मसूद अझरचा मोठा भाऊ मुहम्मद ताहिर अन्वर याचाही पाकिस्तानात गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता.