For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी गजाआड

06:58 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘लष्कर ए तोयबा’चा दहशतवादी गजाआड
Advertisement

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई : पाच दिवसांच्या कोठडीत रवानगी

Advertisement

वृत्तसंस्था /..नवी दिल्ली

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संशयित हँडलर शब्बीर अहमद लोन याला अटक केली आहे. सोमवारा, 30 मार्च रोजी त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता तपास यंत्रणांना त्याच्या नेटवर्कचा अधिक सखोल तपास करता येईल.

Advertisement

दहशतवादी शब्बीर लोनला रविवारी रात्री गाझीपूर परिसरात अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, तो नुकत्याच उघडकीस आलेल्या मेट्रो पोस्टर प्रकरणामागील मॉड्यूलचा हँडलर होता. या मॉड्यूलने दिल्ली आणि कोलकातामधील अनेक ठिकाणी देशविरोधी पोस्टर्स लावल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय सदस्य शब्बीर अहमद लोनला अटक केली आहे. तो बांगलादेशातून भारतविरोधी कारवाया करत होता. तपास यंत्रणांच्या मते, हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर संस्था, आयएसआयच्या पाठिंब्याने कार्यरत होते.

आयएसआयशी संबंध, बांगलादेशातून कारनामे

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित हँडलर्सशी होते. तो बांगलादेशला आपला तळ बनवून भारतात एक नेटवर्क स्थापित करत होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ‘राजा’ आणि ‘काश्मिरी’ या नावांनीही ओळखला जाणारा लोन हा श्रीनगरचा रहिवासी आहे. त्याच्याकडून बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानचे विदेशी चलन, तसेच एक नेपाळी सिम कार्ड जप्त करण्यात आल्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी संशय बळावला आहे.

शब्बीर अहमद लोन याचा यापूर्वी हाफिज सईद आणि झकी-उर-रहमान लखवी यांच्याशी थेट संपर्कात होता. त्याने बांगलादेशातून भारतात दहशतवाद्यांची भरती करून त्यांचे ब्रेनवॉशिंग केले. त्याने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना कट्टरपंथी बनवले आणि आधार कार्डसारखी बनावट कागदपत्रे मिळवून त्यांना भारतात लपवले. तो एनक्रिप्टेड अॅप्सद्वारे संपर्क ठेवत असे आणि दिल्ली व इतर शहरांमध्ये टेहळणी करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

यापूर्वी 2007 मध्ये अटक

शब्बीर अहमद लोनला यापूर्वी 2007 मध्ये दिल्ली पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे एके-47 आणि ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रs होती. त्याला शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर तो बांगलादेशला पळून गेला आणि तेथून त्याने दहशतवादी नेटवर्क पुन्हा सक्रिय केले. तपास यंत्रणांच्या मते, हे मॉड्यूल भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते. त्यांच्या निशाण्यावर लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील भागांना लक्ष्य करण्याचाही समावेश होता. दिल्ली पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईने हा मोठा हल्ला टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश

फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करत आठ जणांना अटक केली. यापैकी सात जण बांगलादेशी नागरिक होते. ते भारतात बेकायदेशीरपणे राहत होते आणि बनावट आधार कार्डांच्या आधारे आपली ओळख लपवत होते. शब्बीर अहमद लोन हा या नेटवर्कचा सूत्रधार होता. शब्बीरने पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद येथील लष्कर-ए-तोयबाच्या कॅम्पमधून मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण घेतले होते. त्याची अटक एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि संभाव्य हल्ल्यांपासून सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

Advertisement
Tags :

.