Radhanagari, Kalammawadi धरणांवरील लेझर शो, रोषणाई दुर्लक्षित, राधानगरी टुरिझमची नाराजी
यामुळे बहुतेक पर्यटकांना या शो बाबत माहितीच नसते
By : महेश तिरवडे
राधानगरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने राधानगरी व काळमावाडी या दोन्ही धरणांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि लेझर शोचे आयोजन गेल्या तीन वर्षांपासून केले जात आहे. रात्रीच्या वेळी धरण परिसरात साकारले जाणारे हे नेत्रदीपक दृश्य पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरू शकते. मात्र, संबधित विभागाकडून याची कोणतीही प्रभावी जाहिरात किंवा प्रसिद्धी करण्यात आलेली नाही.
यामुळे बहुतेक पर्यटकांना या शो बाबत माहितीच नसते. परिणामी, इतक्या मोठ्या खर्चाने तयार करण्यात आलेला हा प्रकाशमय अनुभव केवळ काही स्थानिक हौशी पर्यटकांपुरता मर्यादित राहत आहे. काही स्थानिक लोकांनी आपल्या सोशल मीडियावर या शो चे फोटो व व्हिडीओ शेअर करून याची माहिती देण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो अपुरा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर राधानगरी टुरिझम फोरमने संबंधित विभागाकडे नाराजी व्यक्त करत यावर लक्ष वेधले आहे. फोरमच्यावतीने सांगण्यात आले की, स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला धरणांवरील लेझर शो आणि विद्युत रोषणाई ही अत्यंत आकर्षक असून त्यामार्फत स्थानिक पर्यटनाला मोठा चालना मिळू शकतो. मात्र, यासाठी योग्य प्रकारे मार्केटिंग व प्रचार होणे आवश्यक आहे.
केवळ शो आयोजित करून उपयोग नाही. तर तो लोकांपर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यात पर्यटन वाढवायचे असल्यास जलसंपदा विभागाने याबाबत सकारात्मक पावले उचलावी, अशी मागणी टुरिझम फोरमचे नंदकिशोर सूर्यवंशी, सुहास निंबाळकर, विलास डवर, फिरोज गोलंदाज, सुनील मोरे, सुनील मोरे, बशीर राऊत आदी सदस्यांनी केली आहे.
"राधानगरी व काळम्मावाडी धरणावर गेली तीन वर्षे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धरणावर आकर्षण विद्युत रोषणाई केली जाते. हे कौतुकास्पद असले तरी असले तरी संबंधित विभागाकडून याची जनजागृती होत नाही. तालुक्याच्या पर्यटनवाढीसाठी याची जाहिरात होणे गरजेचे आहे. तसेच ही रोषणाई कमीत कमी आठ दिवस रात्रीच्यावेळी सुरु ठेवावी जेणेकरून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना याचा अनुभव घेता येईल, त्यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळेल."
- सुहास निंबाळकर, उपाध्यक्ष, राधानगरी टुरिझम (फोरम)