Laser Lights: लेझरवर बंदी, पण हाय इंटेन्सिटी लाईटचं काय? उपायोजना कोणत्या?
कोल्हापूरसह अनेक जिह्यांमध्ये प्रशासनाने लेसर लाईट्सवर बंदी घातली आहे
कोल्हापूर : गणेशोत्सव हा उत्साहात व्हावा हीच सर्वांची इच्छा असते. यात अपप्रवृत्ती घुसल्याने रात्री बाराला मिरवणूक बंदी, लेझरसह कर्णकर्कश डिजेवर प्रशासनाने कायदेशीर पडगा उगारण्यास सुरुवात केली. मिरवणुकींमध्ये लेसर किरणांना (लेझर लाईट्स) पर्याय म्हणून प्रकाशझोतांचा (हाय-इंटेन्सिटी लाईट्स) वापर वाढला आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर मिरवणुकीला आकर्षक आणि भव्य बनवण्यासाठी केला जात असला, तरी यामुळे आरोग्याला धोका आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूरसह अनेक जिह्यांमध्ये प्रशासनाने लेसर लाईट्सवर बंदी घातली आहे. मात्र, प्रखर प्रकाशझोतांचा वापर अजूनही बिनदिक्कतणे सुरू आहे.
लेसर किरण आणि प्रखर प्रकाशझोतांचा वापर सजावटीसाठी, मिरवणुकीला आकर्षक बनवण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी केला जातो. लेसर लाईट्स हे विद्युत चुंबकीय उत्सर्जनाद्वारे निर्माण होणारे तीव्र प्रकाशकिरण असतात. ते विशिष्ट रंग आणि दिशेने केंद्रित असतात. प्रखर प्रकाशझोत हे डीजे सिस्टीम्स, स्पॉटलाईट्स तसेच इतर शक्तिशाली प्रकाश यंत्रणांद्वारे सोडले जातात.
दोन्हींचा वापर मिरवणुकींना चमकदार आणि भव्य स्वरुप देत असल्याने तरुणाईला त्याचे आकर्षण आहे. परंतु यामुळे गंभीर आरोग्य आणि सुरक्षा समस्या उद्भवत असल्याने लेझरवर बंदी आली. पण हाय-इंटेन्सिटी लाईट्स अजूनही कायद्याच्या किंवा कारवाईच्या कचाट्याच्या बाहेर आहेत.
प्रखर प्रकाशझोतांचे तोटे
1 - प्रखर प्रकाशझोत थेट डोळ्यांवर पडल्यास डोळ्यांचा पडदा (रेटिना) आणि बुबुळाला (कॉर्निया) गंभीर इजा होऊ शकते. गत वर्षी कोल्हापुरात गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान लेसर किरण थेट डोळ्यांवर पडल्याने अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्या. डझनभर तरुणाची दृष्टी कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. प्रखर प्रकाशझोतांमुळे डोळे दीपून टाकणारा प्रभाव (टेंपोररी ब्लाइंडनेस) किंवा कायमस्वरुपी दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो.
2 - मिरवणुकीत लेझर तसेच प्रखर प्रकाशझोतमुळे गर्दीच्या व्यवस्थापनावर परिणाम करतो. तीव्र प्रकाशामुळे प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊन गोंधळ किंव चेंगराचेंगरीसारख्या घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.
3 - प्रकाशझोतांसाठी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय होतो. तसेच, काही प्रखर प्रकाश यंत्रणा उष्णता उत्सर्जित करतात. ज्यामुळे स्थानिक पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो.
4 - लेझर तसेच तीव्र प्रकाशझोतामुळे प्रेक्षकांना अस्वस्थता, डोकेदुखी किंवा चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो. विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि संवेदनशील व्यक्तींना याचा जास्त त्रास होतो.
5 - लेसर आणि प्रखर प्रकाशझोतांचा अतिवापर मिरवणुकीला व्यावसायिक आणि भपकेबाज स्वरुप देतो. ज्यामुळे उत्सवाची पारंपरिक पावित्र्यता आणि साधेपणा कमी होतो.
प्रशासनाची कायदेशीर कारवाई
कोल्हापूर, यवतमाळ आणि इतर काही जिह्यांमध्ये प्रशासनाने लेसर किरणांच्या वापरावर बंदी घातली. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनीही या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
उपायोजना काय करता येतील ?
गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांमध्ये लेसर आणि प्रखर प्रकाशझोतांचे दुष्परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. मिरवणुकीत पारंपरिक दिवे, फुलांची सजावट आणि पर्यावरणपूरक प्रकाशयंत्रणा यांचा वापर वाढवावा. प्रशासनाने लेसर आणि प्रखर प्रकाशझोत बंदीची कठोर अंमलबजावणी करावी.
उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मिरवणूक आयोजकांना सुरक्षित प्रकाशयंत्रणांचा वापर आणि त्याचे तांत्रिक प्रशिक्षण द्यावे. यासंदर्भात प्रशासन कारवाई करेलच, परंतु नागरिकांचा सहभाग आणि जागरूकताही महत्त्वाची आहे. तरच भावी पिढ्यांसाठी हा सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि अर्थपूर्ण बनवू शकतो.
बंदीची गरज का आहे...!
- लेसर किरणांमुळे डोळ्यांना होणारी गंभीर इजा टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
- मिरवणुकीदरम्यान गर्दी नियंत्रण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लेसर आणि प्रखर प्रकाशझोतांवर निर्बंध आवश्यक आहेत.
- लेसर लाईट्सचा गैरवापर टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राखण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
- गणेशोत्सव हा भक्ती आणि साधेपणाचा उत्सव आहे. प्रखर प्रकाशझोतांचा अतिवापर टाळल्यास उत्सवाचे मूळ स्वरूप टिकून राहील.
लेसर : लेसर म्हणजे तीव्र, केंद्रित आणि एकाच रंगाच्या प्रकाशकिरणांचा किरण, जो विद्युत चुंबकीय उत्सर्जनाद्वारे निर्माण होतो.
प्रखर प्रकाशझोत : प्रखर प्रकाशझोत म्हणजे डीजे लाईट्स, स्पॉटलाईट्स किंवा इतर शक्तिशाली यंत्रणांद्वारे निर्माण होणारा अत्यंत तीव्र आणि चमकदार प्रकाश.