वसतिगृहातील जेवणात अळ्या
अभाविपतर्फे आंदोलन करून निवेदन सादर : अधिकाऱ्यांची नरमाई
बेळगाव : शहरातील विद्यार्थी वसतिगृहात निकृष्ट प्रतीचे जेवण दिले जात आहे. भातामध्ये अळ्या तसेच दगड सापडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी जोरदार आवाज उठविला. निकृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ वसतिगृह प्रमुखांच्या निदर्शनास आणून देत यापुढे असे प्रकार घडल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी मागासवर्गीय तसेच इतर वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांना निकृष्ट प्रतीचे धान्य पुरविले जात आहे. तसेच जेवण करणाऱ्यांकडूनही दुर्लक्ष होत असल्याने जेवणामध्ये अळ्या तसेच दगडाचे तुकडे सापडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अळ्या तसेच किड्यांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब अभाविपच्या निदर्शनास आणून दिली.
वर्षभरापूर्वीदेखील अशाच प्रकारचे आंदोलन मागासवर्गीय वसतिगृहात करण्यात आले होते. त्यावेळीही आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली होती. शनिवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन आंदोलन केले. निकृष्ट प्रतीच्या खाद्यपदार्थाचे नमुने गोळा करत ते वसतिगृह वरिष्ठांना दाखविण्यात आले. जोवर न्याय मिळणार नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर वसतिगृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यासोबतच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असे आश्वासन दिले. यावेळी अभाविपचे अप्पण्ण हडपद, शहर सचिव रोहित अलकुंटे, सहसचिव कौशल गोदगेरी, प्रज्वल अन्निगेरी, संदीप दंडगल, मंजुनाथ हंचिनमनी यासह इतर उपस्थित होते.