शास्त्रीनगर परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या
आरोग्याच्या समस्या वाढल्या : महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी होत असतानाच आता चक्क पाण्यातून अळ्या वाहून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शास्त्रीनगर परिसरात पाण्यामध्ये अळ्या येत असल्याने अनेकांनी पाणी घेणेच बंद केले आहे. तर काहीजण कपडा बांधून पाणी वापरण्यासाठी घेत आहेत. शहरात अशाप्रकारे दुर्गंधीयुक्त आणि अळ्या असलेला पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणीपुरवठा यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
शास्त्रीनगर तिसरा क्रॉस परिसरात मागील काही महिन्यांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी अशुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. बऱ्याचवेळा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागले. सुरुवातीला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे ते बाजूला करून स्वच्छ पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आता मात्र पाण्यातून अळ्या, तसेच लहान किडे येत असल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. अळ्या असलेले पाणी वापरात आल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहेत. या समस्येमुळे नागरिकांनी पाणी वापरणेच बंद केले आहे. पाणीपुरवठा यंत्रणेने याची तात्काळ दखल घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.