गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्यार्क गुजरातकडे
सुमारे1.27 कोटीचा माल : ट्रकचालकाला अटक : गोवा पोलिसांच्या कारवाईकडे लोकांचे लक्ष
पणजी : गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्यार्क गुजरातकडे बेकायदेशीरपणे जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून शुक्रवारी भरूच पोलिसांनी घातलेल्या एका छाप्यात कर्नाटकचा नोंदणीचा एक ट्रक जप्त केला त्यात गोवा बनावटीच्या 56,640 मद्यार्काच्या बाटल्या सापडल्या. बाजारात त्याचा भाव 1 पूर्णांक 27 कोटी ऊपये असून प्राप्त माहितीनुसार गुजरातमध्ये सुमारे दोन कोटी 44 लाख ऊपयांची दारू गोव्यातून गेली असावी, असा कयास आहे.
शुक्रवारी भरूच पोलिसांनी मांडवा टोल प्लाझा येथे कर्नाटक नोंदणीचा नंबर असलेला एक ट्रक कंटेनर ताब्यात घेतले असता त्यात फार मोठा मद्यार्काचा खजिना सापडला. गुजरात पोलिसांच्या माहितीनुसार गोव्यातून आतापर्यंत एका आठवड्यात गेलेला हा चौथा टॅंकर असावा. भरूच पोलिसांनी हा टँकर ताब्यात घेऊन आतून गोवा बनावटीच्या प्रचंड बाटल्या बाहेर काढल्या. आतील दारू गोवा बनावटीची होती, मात्र बाटल्यांवर कोणतीही लेबल्स देखील लावली नव्हती. गोव्यातील एका डिस्टिलरीने हे मद्यार्क तयार केले असून आतापर्यंत तीन टँकर यापूर्वी गेलेले होते आणि पकडलेला चौथा टँकर आहे.
शुक्रवारी भरूच पोलिसांनी पकडलेला हा टँकर दुपारी दीड वा. वडोदराहून सूरतकडे जात होता. ट्रकवर कर्नाटक नंबर प्लेट लावण्यात आलेली होती. ट्रकवरील कंटेनर खुला केला असता त्यात हजारो बाटल्या सापडल्या आणि हे सर्व व्यवहार अनधिकृत होते. पोलिसांनी ट्रकचा चालक जगदीश बिश्नोई याला अटक केली. त्याचबरोबर त्याचे दोन साथीदार विकास खिचड आणि रमेश या दोघांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले. हे साथीदार गुजरात पोलिसांनी वॉन्टेड म्हणून जाहींर केले होते.
यापूर्वी अशाच पद्धतीची गोवा बनावटीची दारू 2 पूर्णांक 44 कोटी ऊपयांची होती तीही जप्त करण्यात आली होती तर चौथ्या कंटेनरमधून 1 पूर्णांक 27 कोटी ऊपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या माहितीनुसार सदर मद्यार्क गोव्यामध्ये बेकायदेशीरपणे बनविले जात होते आणि बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचे लेबल व माहिती नव्हती. गोव्यातून गुजरातपर्यंत मद्यार्क पोहचविण्यासाठी एक गॅंग कार्यरत असून दारू वितरणाची एक साखळीच तयार झालेली होती. गुजरातमधील फार मोठे सिंडिकेट आहे ज्यांच्याशी ते संलग्न आहेत. गुजरात पोलिस गोवा पोलिसांच्या संपर्कात असून गोवा पोलिस आता कोणती कारवाई करते हे पाहावे लागेल.