For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या व्होटर अधिकार पदयात्रा अभियानात कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

11:01 AM Aug 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या व्होटर अधिकार पदयात्रा अभियानात कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
Advertisement

खानापूर ते नंदगड बारा कि. मी. काँग्रेस कार्यकर्त्यांची पदयात्रा

Advertisement

वार्ताहर/नंदगड

अखिल भारतीय काँग्रेसतर्फे देशभरात व्होटर अधिकार पदयात्रा अभियान सुरू करण्यात आले आहे. याला पाठिंबा देण्यासाठी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे रविवारी एआयसीसीच्या सचिव व माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शिवस्मारक ते संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळ नंदगडपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी मार्केटिंग सोसायटीच्या बसप्पाना अरगावी कल्याण मंडपात सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन वाली होते.

Advertisement

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अंजली निंबाळकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, महांतेश राऊत, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा दीपा पाटील, सावित्री मादार, लक्ष्मण मादार आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या सल्ल्याने चालले असल्याची शंका देशभरातील विरोधी पक्षाने व्यक्त केली असून निवडणूक आयोग संविधानाप्रमाणे काम करत नसून भाजपचा बटिक असल्यासारखे वागत असल्यामुळे वोट चोरीसारखे गंभीर देशद्रोही कार्य भाजपच्या हातून होताना दिसत आहे.

राहुल गांधी यांनी व्होट चोरी पुराव्यानिशी उघड पाडले आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी बिहारमधून व्होट चोर... गद्दी छोड किंवा व्होट अधिकार यात्रा हा कार्यक्रम राबवित आहेत. तोच उपक्रम बिहारनंतर देशात खानापूरमध्ये सर्वप्रथम आम्ही राबवत आहोत. आज या उपक्रमात खानापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवल्यामुळे खानापुरातील जनता काँग्रेसच्याच पाठीशी अजूनही ठाम आहे याची जाणीव होते. मी आमदार असताना कोट्यावधीची विविध विकासकामे खानापूर तालुक्यात राबविली आहेत. मात्र सध्या भाजपच्या आमदारांकडून केवळ नारळ फोडले जातात. रस्त्याचे पैसे कोठे जातात.

आज रस्त्यावरील खड्ड्यांत झाडे लावण्याची वेळ जनतेवर आली आहे. त्यांना विकासकामे करता येत नसेल तर खुर्ची खाली करा, म्हणण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.खानापूर तालुक्याचे आमदार बेळगाव येथे जाऊन काँग्रेसच्याच छायेखाली वावरत असल्याचा आरोपही केला. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, आगामी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका तसेच वेगवेगळ्या निवडणुका येणार आहेत. त्यासाठी जनतेने सावध राहून मतदारयादी योग्य आहे की नाही याची पडताळणी करावी. अन्यथा भ्रष्ट भाजप सरकार मतदार यादीतून आपल्या लोकांची नावे काढून टाकतील. व भलत्यांच लोकांची नावे घालून आमच्या डोळ्dयात धूळफेक करेल. यावेळी महांतेश राऊत, सावित्री मादार, लक्ष्मण मादार, गौसलाल पटेल, रायापा बळगपन्नावर, महादेव कोळी, काशिम हट्टीहोळी आदींनी विचार मांडले.

खानापूर ते नंदगडपर्यंत पदयात्रा 

खानापूर येथील शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्dयाला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली. करंबळ, कौंदल, लालवाडी, हेब्बाळ ते नंदगड असा तब्बल 12 किलो मीटरचा प्रवास पायी करण्यात आला. सकाळी 9 वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. 11.30 वाजता नंदगड येथे पदयात्रा पोहोचली. नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मार्केटिंग सोसायटीच्या कल्याण मंडपात भव्य सभा झाली.

Advertisement
Tags :

.