लहान कॅसिनोच्या नावाखाली मोठा कॅसिनो ठरतो बेकायदेशीर
निवृत्त न्यायाधीश रिबेलो यांचा दावा : आंदोलनास पाठिंबा
पणजी : लहान कॅसिनो बोटीच्या बदली मोठी कॅसिनो बोट हस्तांतरीत करता येत नाही आणि तसे करणे बेकायदेशीर असल्याचा दावा निवृत्त न्यायाधीश फर्दिन रिबेलो यांनी केला आहे. तसे पत्र त्यांनी कॅसिनो विरोधी पणजीकर संघटनेला पाठवले असून कॅसिनो विरोधी आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पत्रातून दिलेल्या माहितीनुसार गोवा जुगार कायद्याप्रमाणे कॅसिनो बोटीचा परवाना दुसऱ्या बोटीच्या नावे हस्तांतरीत करण्यास मनाई आहे. कॅसिनो बोट बदलायची असल्यास अगोदर बोटीच्या परवान्यासारख्या समान अटी असणे बंधनकारक आहे आणि बोट तेवढ्याच क्षमतेची असावी लागते. लहान बोटीच्या जागी मोठी बोट बदलण्याची तरतूद नाही, असेही रिबेलो यानी स्पष्ट केले आहे.
जहाज कायदा आणि बंदर कायदा अंतर्गत प्रदूषणाविरोधात प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. परंतु ते कॅसिनो बोटीच्या बाबतीत केले जात नाहीत. मागील सर्व सत्ताधारी सरकारने पणजी राजधानीला भारताची कॅसिनो राजधानी करून टाकले आहे. मांडवी नदीत कॅसिनो बोटीची गर्दी झाल्याने ती प्रदूषित तर झालीच आहे, त्याचबरोबर मांडवी नदीच्या काठावर आणि तेथे वास्तव्य करणाऱ्या लोकांवर कॅसिनो बोटीमुळे दुष्परिणाम होत आहेत. पर्यावरणही बिघडून गेले असून त्या बोटी कसलेच नियम पाळत नाहीत उलट नियम झुगारून मर्जीनुसार वागतात. मांडवी नदीत कॅसिनेंचे अस्तित्व बेकायदेशीर असून ते सरकारने कायदेशीर केल्याचे रिबेलो यांनी पत्रातून म्हटले आहे.