‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत
परदेशी चित्रपट श्रेणीतून नामांकन शर्यतीत 29 चित्रपट, आतापर्यंत 3 भारतीय चित्रपटांना संधी
वृत्तसंस्था/ चेन्नई
चित्रपटसृष्टीत जागतिक पातळीवर सर्वोच्च आणि मानाचा मानला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली आहे. दिग्दर्शिका किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 2024 च्या मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. त्यामुळे किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. चेन्नई येथील एका कार्यक्रमात, द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी 97 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली.
निवड समितीच्या 13 सदस्यीय ज्युरीने ‘लापता लेडीज’ची निवड केली अशी माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जान्हू बऊआ यांनी सोमवार, 23 सप्टेंबरला दिली. पुढीलवषी 17 जानेवारीला पुरस्कारांचे अंतिम नामांकन जाहीर होणार असून 2 मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. विदेशी चित्रपट श्रेणीत नामांकनाच्या शर्यतीत 29 चित्रपट होते. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले आहे. रवी किशन, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रंता आणि नितांशी गोयल यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत