वनडे मालिकेत लंकेची विजयी सलामी,‘सामनावीर’ कुसल मेंडीस
वृत्तसंस्था/डंबुला
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सामनावीर कुसल मेंडीस आणि अविष्का फर्नांडो यांच्यात दमदार शतकांच्या जोरावर यजमान श्रीलंकेने न्यूझीलंडचा डकवर्थ लेवीस नियमाच्या आधारे 45 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेने 49.2 षटकात 5 बाद 324 धावा जमविल्या. पंचांनी खराब हवामानामुळे हा सामना प्रत्येकी 49.2 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. लंकेचा डाव आटोपल्यानंतर पुन्हा पावसाने अडथळा आल्याने खेळ थांबवावा लागला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खेळ सुरू करण्यात आला. त्यावेळी पंचांनी न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 27 षटकात 221 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. पण न्यूझीलंडने 27 षटकात 9 बाद 175 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
लंकेच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. न्यूझीलंडच्या डफीने सलामीच्या निशांकाला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 12 धावा जमविल्या. अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 35.4 षटकात 206 धावांची द्विशतकी भागिदारी केली. फर्नांडोने 115 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 100 धावा झळकविल्या. कुसल मेंडीसने 128 चेंडूत 2 षटकार आणि 17 चौकारांसह 143 धावा झोडपल्या. लंकेचे हे दोन्ह शतकवीर पाठोपाठ बाद झाल्यानंतर समरविक्रमा 5 धावांवर झेलबाद झाला. कर्णधार असालेंका आणि लियानगे यांनी पाचव्या गड्यासाठी 33 धावांची भर घातली. असालेंकाने 28 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 40 धावा जमविल्या. लियानगे 2 चौकारांसह 12 धावांवर नाबाद राहिला. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 34 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे डफीने 41 धावांत 3 तर ब्रेसवेल आणि सोधी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेच्या मेंडीसने 102 चेंडूत 12 चौकारांसह तर फर्नांडोने 114 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह शतके झळकविली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी द्विशतकी भागिदारी 206 चेंडूत नोंदविली. लंकेच्या 300 धावा 281 चेंडूत नेंदविल्या गेल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडच्या डावाला यंग आणि रॉबीनसन् यांनी बऱ्यापैकी सुरुवात करुन देताना पहिल्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. मात्र रॉबीनसन बाद झाल्यानंतर लंकेच्या डावाला गळती सुरू झाली. रॉबीनसनने 36 चेंडूत 4 चौकारांसह 35 तर यंगने 46 चेंडूत 8 चौकारांसह 48, ब्रेसवेलने 32 चेंडूत 5 चौकारांसह 34, मिचेल हे याने 1 षटकारासह 10 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 22 चौकार नेंदविले गेले. लंकेतर्फे मधुशनकाने 39 धावांत 3, तिक्ष्णाने 32 धावांत 2, असालेंकाने 15 धावांत 2 तर व्हॅन्डेरसेने 40 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लंका 49.2 षटकात 5 बाद 324 (अविष्का फर्नांडो 100, कुसल मेंडीस 143, निशांका 12, समरविक्रमा 5, असालेंका 40, लियानगे नाबाद 12, अवांतर 12, डफी 3-41, ब्रेसवेल 1-73, सोधी 1-62), न्यूझीलंड (वियासाठी 27 षटकात 221 धावांचे उद्दिष्ट), 27 षटकात 9 बाद 175 (यंग 48, रॉबीनसन 35, ब्रेसवेल नाबाद 34, हे 10, अवांतर 9, मधुशनका 3-39, तिक्ष्णा 2-32, असालेंका 2-15, व्हॅन्डेरसे 1-40)