For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणला लंकेचे चोख प्रत्युत्तर

06:44 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अफगाणला लंकेचे चोख प्रत्युत्तर
Advertisement

रेहमत शहाचे अर्धशतक, व्ही. फर्नांडोचे चार बळी, लंका बिनबाद 80

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

अफगाणचा क्रिकेट संघ सध्या लंकेच्या दौऱ्यावर असून उभय संघात शुक्रवारपासून सुरू झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी अफगाणचा पहिला डाव 198 धावात संपुष्टात आला. त्यानंतर यजमान लंकेने चोख प्रत्युत्तर देताना दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद 80 धावा जमवल्या.

Advertisement

या एकमेव कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. कोलंबोच्या सिंहलिज क्रिकेट मैदानातील खेळपट्टीवर अफगाणचे फलंदाज अधिक वेळ स्थिर राहू शकले नाहीत. अफगाणतर्फे रेहमत शहाने एकाकी लढत देत 139 चेंडूत 13 चौकारासह 91 धावा जमवल्या. नूर अली झेद्रानने 46 चेंडूत 5 चौकारासह 31, इक्रम अलीखिलने 3 चौकारासह 21, तर कयास अहमदने 1 षटकार आणि 1 चौकारासह 21, निजात मसूदने 1 षटकार, 1 चौकारासह 12 धावा जमवल्या. लंकेतर्फे विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो आणि प्रभात जयसूर्या यांची गोलंदाजी अधिक परिणामकारक झाली. असिथा फर्नांडोने 24 धावात 3, प्रभात जयसूर्याने 67 धावात 3 तर विश्वा फर्नांडोने 51 धावात 4 गडी बाद केले.

या सामन्यात अफगाणचे पहिले अर्धशतक 66 चेंडूत फलकावर लागले. नूर अली झद्रन आणि रेहमत शहा यांनी दुसऱ्या गड्यासाठीची अर्धशतकी भागीदारी 64 चेंडूत पूर्ण केली. या जोडीने 57 धावांची भागीदारी केली. उपाहारावेळी अफगाणने 25 षटकात 2 बाद 90 धावापर्यंत मजल मारली होती. अफगाणचे शतक 181 चेंडूत फलकावर लागले. रेहमत शहाने 7 चौकारासह 80 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने कर्णधार शाहिदीसमवेत तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 104 चेंडूत नोंदवली. या जोडीने 52 धावांची भर घातली. लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर अफगाणचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. चहापानावेळी अफगाणची स्थिती 50 षटकात 5 बाद 168 अशी होती. अफगाणचे दीडशतक 267 चेंडूत नोंदवले गेले. खेळाच्या शेवटच्या सत्रात अफगाणचे शेवटचे पाच गडी 30 धावात तंबूत परतले.

निशान मदुश्का आणि दिमुथ करुणारत्ने या जोडीने लंकेच्या डावाला सावध सुरुवात करताना दिवसअखेर 14 षटकात बिनबाद 80 धावा जमवल्या. मदुश्का 48 चेंडूत 6 चौकारासह 36 तर करुणारत्ने 37 चेंडूत 7 चौकारासह 42 धावावर खेळत आहेत. अफगाणच्या गोलंदाजांना जवळपास तासभराच्या कालावधीत लंकेची ही सलामीची जोडी फोडता आली नाही.

संक्षिप्त धावफलक : अफगाण प. डाव 62.4 षटकात सर्वबाद 198 (रेहमत शहा 91, नूर अली झद्रन 31, इक्रम अलीखिल 21, कयास अहमद 21, निजात मसूद 12, विश्वा फर्नांडो 4-51, असिथा फर्नांडो 3-24, प्रभात जयसुर्या 3-67), लंका प. डाव 14 षटकात बिनबाद 80 (मदुश्का खेळत आहे 36, करुणारत्ने खेळत आहे 42).

Advertisement
Tags :

.