For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकेचा थायलंडवर एकतर्फी विजय

06:41 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकेचा थायलंडवर एकतर्फी विजय
Advertisement

वृत्तसंस्था/डंबुला

Advertisement

2024 च्या आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील बुधवारच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने थायलंडचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. या सामन्यात लंकेची कर्णधार चमारा अटापट्टूला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील सर्व सामने झाले असून आता उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने बाकी आहेत. प्राथमिक फेरीत एकूण 12 सामने खेळविले गेले. भारत, पाक, बांगलादेश आणि लंका या चार संघांनी उपांत्यफेरी गाठली आहे. गुरूवारी स्पर्धेतील विश्रांतीचा दिवस राहिल. शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला उपांत्य सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता तर लंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा उपांत्य सामना सायंकाळी 7.30 वाजता खेळविला जाईल.

Advertisement

थायलंड आणि लंका यांच्यातील सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. 20 षटकात त्यांनी 7 बाद 93 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 11.3 षटकात बिनबाद 94 धावा जमवित विजय नोंदविला.

थायलंडच्या डावात के. नेनापतने एकाकी लढत देत 53 चेंडूत 5चौकारांसह 47, कर्णधार पी. थिपाचाने 17 चेंडूत 1 चौकारासह 13, एस. अपिसेराने 9 चेंडूत 3 चौकारांसह 12 धावा जमविल्या. थायलंडच्या डावात 11 चौकार नांदविले गेले. लंकेतर्फे दिलहारीने 2 तर कुलासुर्या, सुगंधीका कुमारी, प्रियदर्शनी आणि अटापट्टू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. थायलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 28 धावा जमविताना 2 गडी गमविले. थायलंडचे अर्धशतक 79 चेंडूत नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार अटापट्टू आणि गुणरत्ने यांनी 11.3 षटकात अभेद्य 94 धावांची भागिदारी करुन संघाला विजय मिळवून दिला. गुणरत्नेने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 39 तर चमिरा अटापट्टूने 35 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 49 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 5 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविल्या. लंकेने अर्धशतक 50 चेंडूत नोंदविले.

संरिक्षप्त धावफलक: थायलंड 20 षटकात 7 बाद 93 (के.नेनापत 47, पी. थिपाचा 13, एस. अपिसेरा 12, दिलहारी 2-13, कुलसुर्या, सुगांधीका कुमारी, प्रियदर्शनी, अटापट्टू प्रत्येकी 1 बळी), लंका 11.3 षटकात बिनबाद 94 (गुणरत्ने नाबाद 39, अटापट्टू नाबाद 49, अवांतर 6)

Advertisement

.