लंकन संघाची वाटचाल मालिका विजयाकडे
बांगलादेश पराभवाच्या छायेत : मोमिनुल हकचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ चेतोग्राम
दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर लंकेचा संघ मालिका विजयाकडे वाटचाल करीत आहे. या सामन्यात बांगलादेशला निर्णायक विजयासाठी लंकेने 511 धावांचे कठीण आव्हान दिल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात दिवसअखेर 7 बाद 268 धावा जमविल्या. या कसोटीतील बुधवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 243 धावांची गरज असून त्यांचे केवळ 3 गडी खेळावयाचे आहेत. मोमिनुल हकने चिवट फलंदाजी करत अर्धशतक झळकाविले.
या सामन्यात लंकेने पहिल्या डावात 531 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 178 धावांत आटोपला. लंकेने पहिल्या डावात 353 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी 6 बाद 102 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि 40 षटकाअखेर 7 बाद 157 धावांवर डावाची घोषणा केली. लंकेच्या दुसऱ्या डावात मधुष्काने 34 तर मॅथ्यूजने 5 चौकारांसह 56, जयसूर्याने 2 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. बांगलादेशच्या हसन मेहमूदने 65 धावांत 4 तर खलिद अहमदने 2 व शकिब अल हसनने 1 गडी बाद केला.
बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण लंकेकडून मिळालेल्या आव्हानासमोर बांगलादेशची फलंदाजी दडपणाखाली झाली. मोमिनुल हकने 56 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50 धावा जमविल्या. मेहमुद्दुल हसन जॉयने 3 चौकारांसह 24, झाकिर हसनने 2 चौकारांसह 19, कर्णधार शांतोने 2 चौकारांसह 20, शकिब अल हसनने 3 चौकारांसह 36, लिटॉन दासने 4 चौकारांसह 38, शहदात हुसेनने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. मेहदी हसन मिराज 7 चौकारांसह 44 तर ताजुल इस्लाम 2 चौकारांसह 10 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे कुमारा, प्रभात जयसूर्या आणि कमिंदू मेंडीस यांनी प्रत्येकी 2 तर विश्वा फर्नांडोने 1 गडी बाद केला.
मंगळवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मॅथ्यूजचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लंकेने आपला दुसरा डाव घोषित केला. उपहारापर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात बिनबाद 31 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशने 101 धावांमध्ये 4 गडी गमविले. चहापानावेळी बांगलादेशने दुसऱ्या डावात 34 षटकात 4 बाद 132 धावा जमविल्या होत्या. मात्र शेवटच्या सत्रामध्ये बांगलादेशकडून चिवट फलंदाजी झाली. या सत्रामध्ये बांगलादेशने 136 धावा जमविताना 3 गडी गमविले.
संक्षिप्त धावफलक - लंका प. डाव 531, बांगलादेश प. डाव 178, लंका दु. डाव 7 बाद 157 डाव घोषित (मॅथ्यूज 56, जयसूर्या नाबाद 28, मदुष्का 34, हसन मेहमुद 4-65, खलिद अहमद 2-34, शकिब अल हसन 1-39), बांगलादेश दु. डाव 67 षटकात 7 बाद 268 (मोमिनुल हक 50, शकिब अल हसन 36, लिटॉन दास 38, मेहदी हसन मिराज खेळत आहे 44, शांतो 20, जॉय 24, झाकिर हसन 19, टी. इस्लाम खेळत आहे 10, कुमारा, कमिंदू मेंडीस, जयसूर्या प्रत्येकी 2 बळी, विश्वा फर्नांडो 1-39).