For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकेचा भारतावर 32 धावांनी विजय

06:45 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकेचा भारतावर 32 धावांनी विजय
Advertisement

वनडे मालिकेत लंकेची 1-0 अशी आघाडी, व्हँडेरेस सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लंकेचे फिरकी गोलंदाज व्हँडरसे आणि असालंका हे भारतीय संघाचे कर्दनकाळ ठरले. लंकेने भारताचा 32 धावांनी पराभव करत या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. व्हँडरसे ने 33 धावांत 6 तर असालेंकाने 20 धावांत 3 गडी बाद केले. कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक वाया गेले.

Advertisement

यजमान लंकेने भारताला विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे. वेलालगे आणि कमिंदू मेंडीस यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 72 धावांच्या भागिदारीमुळे लंकेने 50 षटकात 9 बाद 240 धावांपर्यंत मजल मारली. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे प्रभावी गोलंदाज ठरले.

लंकेचा कर्णधार असालंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर सलामीचा फलंदाज निशांका मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडीस यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 16.5 षटकात 74 धावांची भागिदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने स्वत:च्याच गोलंदाजीवर अविष्का फर्नांडोला टिपले. त्याने 62 चेंडूत 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. फर्नांडो बाद झाल्यानंतर कुशल मेंडीस फारवेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरने त्याला पायचीत केले. मेंडीसने 42 चेंडूत 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. समरविक्रमाने 1 चौकारासह 14 तर कर्णधार असालंकाने 42 चेंडूत 3 चौकारांसह 25 आणि लियानगेने 29 चेंडूत 12 धावा जमविल्या. 34.5 षटकात लंकेची स्थिती 6 बाद 136 अशी केविलवाणी होती. वेलालगे आणि कमिंदू मेंडीस यांनी संघाचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने सातव्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केल्याने लंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. कुलदीप यादवने वेलालगेला दुबेकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 39 धावा जमविल्या. कमिंदू मेंडीस चोरटी धाव घेण्याच्या नादात अय्यरच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. त्याने 44 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा केल्या. अकिला धनंजयने 13 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमवित तो धावचीत झाला. अकिला धनंजय डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. लंकेच्या डावामध्ये 2 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने 30 धावांत 3 तर कुलदीप यादवने 33 धावांत 2 गडी बाद केले. मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 42 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यांनी 119 धावा जमविताना 5 गडी गमाविले. शेवटच्या 10 षटकांमध्ये लंकेने 79 धावा जमविताना 3 गडी गमाविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला कर्णधार रोहित शर्मा आणि गिल यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 13.3 षटकात 97 धावांची भागिदारी केली. डावातील 14 व्या षटकात व्हँडरसेने रोहित शर्माला निशांकाकरवी झेलबाद केले. शर्माने 44 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 64 धावा झोडपल्या. शर्मा बाद झाल्यानंतर भारताचे आणखी 3 फलंदाज झटपट बाद झाले. व् व्हँडरसेने गिलला झेलबाद केले. गिलने 44 चेंडूत 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. व्हँडरसेने भारताला आणखी एक धक्का देताना याच षटकातील पाचव्या चेंडूवर शिवम दुबेला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. व्हँडरसेने सावध फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीलाही बाद करुन भारतावर दडपण आणले. कोहलीने 19 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. 20.3 षटकाअखेर भारताची स्थिती 4 बाद 130 अशी होती. लंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांवर दडपण आणण्यात यश मिळविले. अक्षर पटेलने 44 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 44 धावा जमविल्या. वॉशिंग्टन सुंदरने 15 धावा केल्या. भारताचा डाव 42.2 षटकात 208 धावांत आटोपला. लंकेतर्फे जेफ्री व्हँडरसेने 33 धावांत 6 तर असालंकाने 20 धावांत 3 गडी बाद केले. भारताच्या डावामध्ये 6 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात भारताने 76 धावा जमविल्या. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात भारताने 124 धावा जमविताना 8 गडी गमाविले. शेवटच्या पॉवरप्लेमध्ये भारताने 8 धावा जमविताना 2 गडी गमाविले. शर्माने आपले अर्धशतक 29 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकाविले. लंकेने हा सामना 32 धावांनी जिंकून या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

संक्षिप्त धावफलक - लंका 50 षटकात 9 बाद 240 (अविष्का फर्नांडो 40, कुशल मेंडीस 30, समरविक्रमा 14, असालंका 25, लियानगे 12, वेलालगे 39, कमिंदू मेंडीस 40, अकिला धनंजय 15, अवांतर 24, वॉशिंग्टन सुंदर 3-30, कुलदीप यादव 2-33, मोहम्मद सिराज 1-43, अक्षर पटेल 1-38).

भारत 42.2 षटकात सर्वबाद 208 (रोहित शर्मा 64, गिल 35, कोहली 14, अक्षर पटेल 44, वॉशिंग्टन सुंदर 15, अवांतर 15, व्हँडरसेने 6-33, असालंका 3-20).

Advertisement
Tags :

.