For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूस्खलन प्रवण राष्ट्रीय महामार्ग

06:30 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
भूस्खलन प्रवण राष्ट्रीय महामार्ग
Advertisement

संपूर्ण राष्ट्रातल्या विविध प्रदेशांना जोडण्यासाठी, तेथील विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग योजना राबवायला सुरुवात केली होती. त्यासाठी भारतीय संसदेच्या 1988 सालच्या कायद्याद्वारे रस्ता वाहतूक आणि महामार्ग खात्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 1995 पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरातल्या प्रदेशांना जोडण्यासाठी कार्यरत झाले. महामार्गाचे एकंदर नियोजन, विकास, व्यवस्थापन आणि डागडुजी करण्याचे कार्य या प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे.

Advertisement

श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 बांधण्यात आलेला आहे, तो उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडत असून, हा 4112 किलोमीटर लांबीचा देशातला सगळ्यात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी हा महामार्ग बांधताना मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड, खोदकाम आणि दगड फोडण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटकं आणि धरणीच्या एकंदर कंपनाला कारणीभूत असणाऱ्या यंत्रसामुग्रीचा वारेमाप वापर, पर्यावरणीय मूल्ये आणि प्रचलित कायदे कानून यांच्याकडे दुर्लक्ष करून महामार्गाची केलेली निर्मिती जेव्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी होते, भूकंप होतात, त्यावेळी बऱ्याचदा राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनाला सामोरे जाऊन हे महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक होत असल्याचे सिद्ध झालेले आहे.

देशातल्या व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी आणि एकंदर अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावत असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेथे जेथे मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टी सुरू आहे, तेथे भूस्खलन होऊन मनुष्य आणि मालमत्ता हानी होण्याच्या वारेमाप दुर्घटना होऊ लागलेल्या आहेत. गेल्याच आठवड्यात मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 उत्तर कन्नड या कर्नाटकातल्या जिल्ह्यातल्या अंकोला जवळच्या शिरूर येथे उद्भवलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत सातपेक्षा जास्त व्यक्तींना मृत्यू आलेला आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावरच्या डोंगराचा कडा कोसळून शिरूरला जी दुर्घटना उद्भवली, त्याला सदोषपूर्ण आराखडा कारणीभूत असल्याचा आरोप कर्नाटक सरकारच्या महसूल मंत्र्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावरती केलेला आहे. शिरूर येथे उद्भवलेल्या भूस्खलनात कितीजण मृत्युमुखी पडले याबाबत सरकारी सूत्रांना सांगणे कठीण झालेले आहे. महामार्गासाठी जे खोदकाम करण्यात आले होते, ते सदोषपूर्ण असल्याबाबतचा यापूर्वीच राज्य सरकारने पत्र व्यवहार केला होता. पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर भूस्खलनाच्या दुर्घटना 2015 पासून उद्भवलेल्या असून, त्यात प्रवाशांना करूण मृत्यू आलेले आहेत. दोन्ही महानगरांना जोडण्यासाठी बांधण्यात आलेला हा महामार्ग तेथे उद्भवणाऱ्या प्राणघातक अपघातांच्या दुर्घटनेमुळे प्रकाशात आलेला होता. यापूर्वी या महामार्गावरती आदोशी, कामशेत येथे उद्भवलेल्या भूस्खलनामुळे वाहतूक सेवा विस्कळीत होण्याच्या घटना बऱ्याचदा घडलेल्या आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती दरडी कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरूच असून, पावसाळ्यात हे प्रमाण जास्त असते. या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसल्याकारणाने वारंवार अडथळे निर्माण केले जात असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होऊन, प्रवाशांना मन:स्तापांना सामोरे जाण्याची वेळ येत असते.

Advertisement

रामनगर-लोंढामार्गे कर्नाटकला गोव्याशी जोडणाऱ्या अनमोड घाटमार्गावर पावसात दरडी कोसळण्याच्या दुर्घटना वारंवार उद्भवतात. सध्या हा महामार्ग गेल्या काही वर्षांपासून अपघातप्रवण होऊन बऱ्याच जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनांसाठी सध्या बंद करण्याचा आदेश उत्तर कन्नड जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे ही वाहतूक चोर्लाघाट मार्गातून वळविलेली आहे. अनमोड घाटमार्गाचा विस्तार करण्याची योजना नियोजनाअभावी आणि एकंदर भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष करून राबविली जात असल्याकारणाने दरडी कोसळण्याच्या दुर्घटना नियंत्रित करणे प्राधिकरणला जमलेले नाही. सध्या अवजड वाहनांची वाहतूक चोर्ला घाटातून होत असल्याने इथल्या अरुंद आणि ख•sमय रस्त्यावर प्राणघातक अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारासाठी महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या महाकाय आणि शतकोत्तर वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केलेली आहे आणि त्या बदल्यात नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थेची झालेली अपरिमित हानी भरून काढण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना अपयश आलेले आहे.

उत्तराखंडातील उत्तर काशी जिल्ह्यातल्या गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरच्या धारसू, नालूना, डाबरकोट या जागांवरती भूस्खलनाच्या दुर्घटना उद्भवल्याने हा महामार्ग प्रदीर्घकाळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असतो. चमोलीतल्या मार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार उद्भवत असतात. हिमाचल प्रदेशातल्या सिमल्यात वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे दुर्घटना उद्भवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून तेथील बऱ्याच जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय मार्ग पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टीच्या प्रसंगी भूस्खलनाला सामोरा जात असतो आणि या मार्गातून प्रवास करणाऱ्या वाहनांना सातत्याने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत मार्गक्रमण करावे लागत असते. हीच परिस्थिती माल वाहकांना जम्मू-काश्मिर, लेह, लडाख येथून जाणाऱ्या महामार्गावर भोगावी लागत असते. यंदा मान्सून सुरू झाल्यापासून उत्तराखंडातील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. भारत-चीनच्या सीमावर्ती, अरुणाचल प्रदेशातल्या गावांना जोडणारा महामार्गही यंदा ठप्प झाला होता आणि वाहनचालकांना विलक्षण गैरसोयींना सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रीय महामार्ग जेथून निर्माण केला जातो, तेथील भौगोलिक आणि भूविज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास आणि सर्वेक्षण करणे नितांत गरजेचे आहे. महाकाय बोगदे खोदून आणि स्फोटकांचा वापर करून दगड फोडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भूकंप प्रवण त्याचप्रमाणे जेथे जेथे वारंवार भूस्खलनाच्या दुर्घटना उद्भवतात, त्या संवेदनशील प्रदेशाचे सर्वेक्षण करून तेथून महामार्ग निर्माण करण्याचे काम टाळणे शक्य आहे. याबाबत विचार झाला पाहिजे. रस्त्याच्या दुतर्फा मृदा संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य देणाऱ्या वृक्षाच्या लागवडीला आणि अभिवृद्धीला चालना दिली पाहिजे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गावर वारंवार उद्भवणाऱ्या भूस्खलनाच्या दुर्घटनांना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.