हिमाचल प्रदेशातील शिमला येथे भूस्खलन
उत्तर प्रदेशात दोन दिवसात 63 बळी : बिहारमध्ये 82,000 लोकांना पूरस्थितीचा फटका
वृत्तसंस्था/ शिमला, नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशातील शिमला जिह्यातील जांगलिख पुलाजवळ सोमवारी सकाळी भूस्खलन झाले. 100 फुटांपेक्षा जास्त उंचीचा एक डोंगर कोसळल्यानंतर रस्ता बंद झाला. दुसरीकडे, नेपाळमधून गंडक नदीत पाणी सोडल्याने बिहारमधील पश्चिम चंपारण आणि सुपौल येथील 23 गावांमध्ये पूर आला आहे. या पुरामुळे अंदाजे 82,000 लोकांना फटका बसला आहे. तर उत्तर प्रदेशात गेल्या दोन दिवसांत वादळ आणि पावसामुळे 63 जणांचा बळी गेला आहे.
हिमाचल प्रदेशातील शिमला जिह्यात सोमवारी सकाळी भूस्खलन झाले. रोहरूच्या छोहरा ब्लॉकमधील जांगलिख पुलाजवळ 100 फुटांपेक्षा जास्त उंचीचा एक डोंगर अंदाजे 25 ते 26 सेकंदात कोसळला. माती-दगड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला. हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. राज्याचे सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा 1.9 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.
उत्तर प्रदेशात, चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. गोंडा आणि बदाऊन येथील छोट्या पुलांवरून पाणी वाहत आहे. राज्यातील आठ नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. कुशीनगरमधील दोन गावांतील 1,400 कुटुंबे प्रभावित झाली आहेत. राज्यातील 46 जिह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या अनेक भागांमध्ये पूर आला आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर, सागर, शहडोल आणि रेवा विभागांमध्ये तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे.
छत्तीसगडधये ‘आयएएफ’ने केली 12 जणांची सुटका
भारतीय हवाई दलाने छत्तीसगडमधील दंतेवाडाजवळ इंद्रावती नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 12 जणांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका केली. ते डोंगाघाट गावाजवळ नदीकिनारी असलेल्या मातीच्या घराच्या छतावर अडकले होते. वाढत्या पुराच्या पाण्यामुळे छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. एका गरुडा कमांडोने छतावर उतरून हेलिकॉप्टरमधून लोकांची सुटका केली.
केदारनाथ मार्गावर 1,500 यात्रेकरूंची सुटका
एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि डीडीआरएफच्या संयुक्त पथकांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावरील चिरबासाजवळ भूस्खलनामुळे अडकलेल्या सुमारे 1,500 यात्रेकरूंची सुटका केली. माती-दगडांनी व्यापलेल्या मार्गातून यात्रेकरूंना बाहेर काढून गौरीकुंड येथे नेण्यात आले. येथे सतत दगड कोसळत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे.