For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिमाचलमध्ये भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू

06:53 AM Aug 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिमाचलमध्ये भूस्खलन  11 जणांचा मृत्यू
Advertisement

उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागसह 4 जिह्यांमध्ये ढगफुटी; 5 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ शिमला, नवी दिल्ली

हिमाचल प्रदेशातील चंबा जिह्यातील भरमौर येथे मुसळधार पावसादरम्यान मणि महेश यात्रेला निघालेल्या 11 भाविकांचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 जण पंजाबचे, एक उत्तर प्रदेशमधील आणि 5 जण चंबा येथील असल्याची माहिती देण्यात आली. अद्याप दोघांची ओळख पटलेली नाही. डोंगरावरून दगड पडल्याने आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी गेल्या आठवड्यात झालेल्या भूस्खलनात 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तसेच 9 जण बेपत्ता झाले आहेत.

Advertisement

भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर भरमौरमध्ये सुमारे 3 हजार मणि महेश भाविक अडकले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे, गुरुवारी रात्री उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि टिहरी गढवाल जिह्यात ढगफुटीमुळे 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच तीन जण बेपत्ता आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांचे पथक बाधित जिह्यांमध्ये दाखल झाले आहे. बागेश्वर जिह्यातील पौसारी येथे रात्रीच्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. रुद्रप्रयागच्या जाखोली येथे घर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. 4 नेपाळी आणि 4 स्थानिकांसह 8 कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. रुद्रप्रयागमध्ये ढिगाऱ्यात अडकलेल्या 70 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांची पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर आहे. पाणी निवासी भागातही घुसले आहे. चमोलीमध्येही अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

 

पंजाबमध्ये पुरामुळे 6 जणांचा मृत्यू

पंजाबमधील पठाणकोट, गुरुदासपूर, अमृतसर, तरणतारन, फाजिल्का, कपूरथला आणि होशियारपूर या जिल्ह्यांमधील बहुतांश भाग गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या विळख्यात आहे. येथील 250 हून अधिक गावे 5 ते 15 फूट पाण्याने भरली आहेत. आतापर्यंत 6 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 जण बेपत्ता आहेत.

रुद्रप्रयाग, चमोली, देहराडून, बागेश्वरमध्ये रेड अलर्ट

शुक्रवार दुपारनंतर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली, देहराडून आणि बागेश्वर जिह्यात मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिह्यातील बासुकेदार येथे मुसळधार पावसानंतर ढगफुटीमुळे अनेक लोक अडकले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफ पथके दाखल झाली असली तरी अनेक ठिकाणी माती आणि दगडांच्या ढिगाऱ्यांमुळे बचाव पथकांना बाधित गावात पोहोचण्यातही अडचणी येत आहेत.

दिल्ली-एनसीआरमध्ये विमानसेवा प्रभावित

दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली विमानतळाने मुसळधार पावसादरम्यान प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी जारी करत लोकांना प्रवास करण्यापूर्वी विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमानांशी संबंधित माहिती घेण्यास सांगितले आहे. दिल्ली विमानतळावर वाहतूक सुरू असली तरी काही विमाने उशिराने ये-जा करत होती. शुक्रवारी सकाळी 11:30 वाजेपर्यंत दिल्ली विमानतळावर 146 विमानांनी उ•ाण घेतले आणि 30 विमाने उशिरा उतरल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

हरियाणात पूल कोसळला

गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हरियाणाच्या पंचकुला येथील टांगरी नदीवरील पुलाचा मोठा भाग पाण्याने वाहून गेला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी तेथे नाकेबंदी करत लोकांना तेथून जाण्यास बंदी घातली आहे. पुलाचा मधला भागच कोसळल्यामुळे वाहतूक बंद आहे. या दुर्घटनेनंतर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

ओडिशात 100 गावे सलग पाचव्या दिवशी पूरमय

ओडिशात पाऊस थांबल्याने प्रमुख नद्यांची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा खाली आली आहे. शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी बालासोर, भद्रक आणि जाजपूर जिह्यातील सुमारे 100 गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. गावांमधील सुमारे 30,000 लोक पुराच्या पाण्याने बाधित आहेत. बालासोरच्या बलियापाल आणि भोगराई ब्लॉकमधील 80 गावे सुमारे 4 फूट उंचीच्या पुराच्या पाण्याने वेढली आहेत, तर जाजपूर जिह्यातील दशरथपूर ब्लॉकमधील इतर 14 गावांमध्येही अशीच परिस्थिती आहे.

Advertisement
Tags :

.