For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमिनी घेतल्या, मात्र नुकसानभरपाई नाहीच!

10:24 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
जमिनी घेतल्या  मात्र नुकसानभरपाई नाहीच
Advertisement

हलगा येथील शेतकरी अडचणीत : एसटीपी प्रकल्पाचे गांभीर्य हरवले : कार्यवाही त्वरित न केल्यास आंदोलनाचा इशारा

Advertisement

बेळगाव : हलगा सांडपाणी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली. त्या ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. असे असताना शेतकऱ्यांना अजूनही त्या जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. याचबरोबर महानगरपालिकेमध्येही बैठक घेऊन जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव बेंगळूरला पाठविला. मात्र अद्याप त्याबाबत कोणतेच पाऊल सरकारने उचलले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

भरपाई मिळाल्यानंतरच काम सुरू

Advertisement

हलगा येथील तिबार पीक शेतजमीन एसटीपी प्रकल्पासाठी घेण्यात आली. एकूण 19 एकर 20 गुंठे ही जमीन आहे. जवळपास 160 शेतकऱ्यांची ही जमीन असून त्या शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया देण्यात आला नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांनी एसटीपी प्रकल्पाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन करून ते काम बंद पाडले. जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यास देणार नाही, असा शेतकऱ्यांनी निर्धार केला.

आश्वासनाची पूर्तता करा

शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर तेथील काम अंतिम टप्प्यात असले तरी ते सध्या पूर्णपणे बंद ठेवले आहे. सदर जमीन ताब्यात घेताना शेतकऱ्यांना त्या जमिनीची रक्कम बाजारभावाप्रमाणे दिली जाईल, असे सांगितले होते. याचबरोबर घरातील एका व्यक्तीला नोकरी आणि हवे तर प्लॉट देखील देवू, असे आश्वासन मनपाने दिले होते. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी दडपशाही करत हिसकावून घेतल्या. त्यानंतर त्या ठिकाणी एसटीपी प्रकल्पाची इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. नुकसानभरपाई देण्याबाबत पाऊलच उचलले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

किमान एकरी 4 कोटी रुपये नुकसानभरपाई द्या

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याचबरोबर महानगरपालिकेमध्ये देखील बैठक घेऊन शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसानभरपाई देण्याबाबत ठराव करण्यात आला. तो ठराव पाठवून दिल्याचे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिकेने स्पष्ट केले. मात्र अद्याप कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले असून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. किमान एकरी 4 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जमिनी गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

एसटीपी प्रकल्पाला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यामुळे शेतकरी भूमीहीन झाले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तेव्हा तातडीने सर्व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली नाही तर आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.