घरमालक, भाडेकरुचा गळा चिरुन खून
घरमालक रिचर्ड डिमेलो, तर अभिजित गुप्ता भाडेकरु : मोरजीनंतर साळगाव दुहेरी खुनाने गोवा हादरला,संशयित घरमालकाची स्कूटर घेऊन रेल्वेतून पसार
म्हापसा : राज्यात दिवसेंदिवस गुह्यांच्या प्रमाणात वाढ होत चालली असून गुऊवारी सकाळी साळगाव मुड्डोवाडा येथे दुहेरी खुनाचे वृत्त येताच गोवा पुन्हा हादरुन गेला. बुधवारी मोरजी येथील उमाकांत खोत यांच्या खुनामुळे गोवा हादरला होता. खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. साळगावची दुहेरी खुनाची घटना पहाटे झाली असली तरी ही घटना दुपारनंतर उजेडात आली. त्यामुळे संशयितांना राज्यातून पळण्यास मोठी मदत झाल्याचे आढळून आले आहे.
उपअधीक्षक विश्वास कर्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीमध्ये रिचर्ड डिमेलो (55 वर्षे) हे गिरी बार्देश येथील नागरिक असून ते ट्रोजन डिमेलो यांचे बंधू होत. दुसऱ्या मयत व्यक्तीचे नाव अभिजित गुप्ता (45 वर्षे) हे डिमेलो यांच्या घरी भाडेकरू म्हणून गेल्या 10 वर्षापासून अधिक काळ राहत होते. रिचर्ड डिमेलो यांचे साळगाव पंचायतीच्याखाली संगीत वाद्यांचे दुकान असून अभिजित हा त्यांच्याकडे म्युझिशियन टॅक्निशियन म्हणून कामाला होता. हा खून नेमका का झाला, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांना ते एक आव्हान बनले आहे.
अभिजितचा मित्र स्कूटर घेऊन पसार
साळगाव मुड्डोवाडा येथे श्रीलक्ष्मीनारायण मंदिराच्यामागे भाड्याच्या खोलीत गुऊवारी पहाटे हा दुहेरी खून झाला असावा, मात्र तो दुपारनंतर उघडकीस आला. रिचर्ड डिमेलो हे मूळ नागवे हडफडे येथील रहिवासी असून त्यांचे वाद्यांचे दुकान साळगाव पंचायतीच्याखाली आहे. अभिजित गुप्ता साळगाव मुड्डोवाडा येथे रिचर्ड यांच्या दुसऱ्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. बुधवारी त्याला भेटायला रिचर्ड हे साळगावला गेले होते, असे उघडकीस आले आहे. त्यावेळी अभिजित गुप्ता याच्याबरोबर अन्य एक इसम राहत होता, तो रिचर्ड यांची स्कूटर घेऊन फरार झाल्याचे प्राथमिक चौकशीअंती उघड झाले आहे.
दोघांचाही गळा चिरून सुऱ्याने खून
रिचर्ड डिमेलो हे बुधवारी रात्री उशिरा अभिजित गुप्ता याला भेटायला साळगावला गेले होते.त्यावेळी त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झाले असावे आणि भांडणाचे पर्यावसान खुनात झाले असावे, असा कयास आहे. रिचर्ड डिमेलो यांच्यावर स्वयंपाक कुकरने वार करून नंतर त्यांचा गळा चिरला असल्याचे उघडकीस आले आहे. अभिजित याचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांचेही खून कोणी केले? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संशयित रिचर्डच्या स्कूटरने पसार
संशयित खून केल्यावर रिचर्ड डिमेलो यांच्या स्कूटरने थिवी रेल्वेमार्गे पसार झाल्याचे आढळून आले आहे. रिचर्ड यांची स्कूटर थिवी रेल्वे स्थानकावर पार्किंग स्लॉटमध्ये आढळून आली आहे. कोलवाळ पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसपथक सायंकाळी उशिरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये संशयिताची छबी तपासण्यात मग्न होते.
भाडेकरुची माहिती पोलिसांना न दिल्याने मोठी अडचण
अधिक माहितीनुसार अभिजित गुप्ता हा गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ रिचर्ड डिमेलो यांच्याकडे कामाला होता. अभिजित हा मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे आढळून आले असले तरी काहीजणांच्या म्हणण्यानुसार तो बिहार येथील तर काहींच्या मते तो उत्तरप्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजते. मात्र तो नेमका कुठला होता, याबाबत कोणतीही माहिती नाही. रिचर्ड यांनी त्याला भाडेकरु म्हणून ठेवले होते, तरीही त्याची माहिती पोलिसस्थानकास दिली नव्हती, असेही उघड झाले आहे. बुधवारी रात्री अभिजितच्या खोलीत आलेला तो दुसरा इसम कोण होता? याबाबतही कोणाला काहीही माहिती नाही. टेनंट व्हेरिफिकेशन न केल्यामुळे खुनाचा शोध घेण्यात पोलिसांसमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
श्वान शंभर मीटरवर जाऊन परतले
गुरुवारी दुपारी रिचर्ड डिमेलो व त्यांचा भाडेकरु अभिजित गुप्ता या दोघांचेही मृतदेह एकाच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यामुळे साळगावसह संपूर्ण गोवा पुन्हा हादरुन गेला. खुनाची माहिती मिळताच साळगाव पोलिस तसेच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक विश्वेष कर्पे, निरीक्षक राहुल परब, निरीक्षक मिलींद भुईंबर, फॉरेन्सिक पथक, श्वानपथक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. श्वान 100 मीटरच्या अंतरावर जाऊन परतले. पोलिसांना काहीच धागेदोरे न सापडल्याने मोठे आव्हान उभे राहिले आहे.