रीळ, उंडी प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी ८० टक्के जमीन मोजणी पूर्ण
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील रीळ आणि उंडी गावांमध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी सरकारने इरादा जाहीर केला आहे. प्रस्ताविक क्षेत्राची जमीन मोजणी सुरू असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
रीळ गावातील १३६ सातबारांवरील १५३ हेक्टर जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित झाले आहे. तर उंडी गावामध्ये ४९ सातबारा भागांवरील६० हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. एकूण २१३ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या सर्व जमीन मालकांना शासकीय मूल्याच्या चार पट एवढ्या प्रमाणात मोबदला मिळेल. रत्नागिरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचा प्रस्ताव रत्नागिरी तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवला. त्यानंतर जमीन मोजणी २० सप्टेंबरपासून सुरू झाली. हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी आतापर्यंत ४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. यावर येत्या सोमवारी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आक्षेप दाखल करणाऱ्या लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. त्यानंतर संपादनाविषयी पुढील निर्णय होईल.