For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोट्या सह्या करून जमीन विकली

06:32 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
खोट्या सह्या करून जमीन विकली
Advertisement

बाळेकुंद्रीच्या वृद्धाला मार्केट पोलिसांकडून अटक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

साठ वर्षांपूर्वी निधन झालेल्या वृद्धाच्या नावे खोट्या सह्या करून होनिहाळ, ता. बेळगाव येथील त्याच्या मालकीची जमीन दुसऱ्यांना विकल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी बाळेकुंद्री खुर्द येथील एका वृद्धाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

विष्णू कृष्णराव पाटील (वय 67) राहणार लक्ष्मीनगर, बाळेकुंद्री खुर्द असे त्या वृद्धाचे नाव आहे. होनिहाळ येथील बसय्या बाळय्या पुजेरी यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. आपल्या वडिलांच्या नावावरील जमिनीची खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने विक्री केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते.

मृत वृद्धाच्या नावे खोट्या सह्या करून खरेदी केल्याचे कबूल

मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विष्णू पाटील या वृद्धाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता साठ वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या बसय्याचे आजोबा दुंडय्या बसलिंगय्या पुजारी यांच्या नावे असलेली एका सर्व्हे नंबरमधील 37 गुंठे, दुसऱ्या सर्व्हे नंबरमधील 35 गुंठे जमीन बळकावण्यासाठी 8 एप्रिल 2024 रोजी दक्षिण उपनोंदणी कार्यालयात मृत वृद्धाच्या नावे सह्या करून खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्याने कबूल केले.

बनावट खरेदी-विक्री संबंधीच्या प्रकरणांचा मार्केट पोलिसांनी छडा

साठ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या दुंडय्या पुजारी या वृद्धाच्या जागेवर आपणच दुंडय्या असल्याचे भासवून विष्णू पाटीलने खरेदी-विक्रीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे शनिवारी मार्केट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गेल्या महिन्याभरात बनावट खरेदी-विक्री संबंधीच्या अनेक प्रकरणांचा मार्केट पोलिसांनी छडा लावला आहे.

Advertisement
Tags :

.