वजरी-पेडणे येथील जमीन पुन्हा ‘नो डेव्हलपमेंट झोन’
नगर नियोजन खात्याचा महत्त्वाचा निर्णय : वजरी भागातील बांधकामांवर निर्बंध
पणजी : वजरी-पेडणे येथील 11 लाख चौ. मी. जमीन पुन्हा एकदा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ (एनडीझेड - विकास प्रतिबंधित क्षेत्र) करण्याचा निर्णय नगर नियोजन मंडळाने घेतला असून प्रादेशिक आराखडा 2021 नुसार ती जमीन पुनर्स्थापित करण्याचे ठरवण्यात आले आहे. उपरोक्त जमीन या अगोदर एनडीझेडमध्ये समाविष्ट होती, परंतु विविध विकासकामे प्रकल्पांचे प्रस्ताव आल्यामुळे त्या जमिनीच्या वर्गीकरणात बदल करण्यात आला होता. त्याचा आढावा घेण्यात आला आणि प्रादेशिक आराखड्याचे उल्लंघन होणार, असे लक्षात आल्यामुळे हा फेरबदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशा बदलांची छाननी करण्यात येत असून आराखड्याप्रमाणे मूळ स्थिती पुन्हा बहाल करण्याचे धोरण नगरनियोजन खात्याने आखले आहे. या निर्णयामुळे वजरी भागातील बांधकामांवर निर्बंध आले असून कोणत्याही प्रकल्पांना तेथे अनुमती मिळणार नाही. त्यामुळे तेथील नैसर्गिक अधिवास, पर्यावरण, जलस्रोत यांचे रक्षण होणार आहे. सरकारच्या व नगरनियोजन खात्याच्या या निर्णयावर काही जमीनमालक, व्यावसायिक बिल्डर, डेव्हलपर यांनी नाराजी वर्तवली आहे. गुंतवणूक, विकास यावर परिणाम होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. तथापि, प्रादेशिक आराखड्याचे पालन करुनच पुढील विकासकामे निश्चित करण्यात येणार असून पर्यावरणाचे रक्षण, शाश्वत विकास अशी सरकारची भूमिका असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.