150 कोटीच्या ड्रेनेज प्रकल्पास जमीन खरेदी
सांगली :
सांगलीवाडीच्या विस्तारीत भागातून कृष्णा नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने महापालिकेने जमीन खरेदीचा दस्त केला. सुमारे 150 कोटीच्या योजनेमुळे सांगलीवाडीतील ड्रेनेजची समस्या निकालात निघणार आहे. योजनेसाठी चार गुंठे खरेदीचा दस्त सोमवारी करण्यात आला.
महापालिका क्षेत्रातील सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील ड्रेनेजच्या समस्येवर मनपा प्रशासनाच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून गांर्भियाने काम सुरू आहे. मुख्य शहराबरोबरच विस्तारीत भागातील तसेच शहराच्या लगतचा भाग आणि नव्याने वसणाऱ्या कॉलनीज येथील ड्रेनेजची समस्या निकालात काढण्यासाठी समांतर उपाययोजना सुरू आहेत. मनपा क्षेत्रातील सांगलीवाडीतील विशेषत: जोतिबा मंदिर परिसरासह विस्तारीत भागातून कृष्णेत मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नविन पंपींग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सांगलीवाडीतील जोतिबा मंदिर परिसरात हे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेच्यावतीने सोमवारी सांगलीवाडीतील चार गुंठे जमीन खरेदी करण्याचा दस्त करण्यात आला. लवकरच येथे पंपिप स्टेशन उभारण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.
मनपा नगररचना व ड्रेनेज विभागाकडून जमीन खरेदीचा दस्त करण्यात आला. सुमारे 150 कोटी रूपयांची ही योजना आहे. सांगलीवाडीची गेल्या पंचवीस वर्षात लोकसंख्या आणि विस्तारही वाढत चालला आहे. भविष्यातील किमान वीस ते पंचवीस वर्षाचा विचार करून ड्रेनेजची समस्या निकालात काढण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाने ही योजना तयार केली आहे. जोतिबा मंदिर परिसरातील नवीन वसाहती व कॉलन्यांना याचा विशेषकरून फायदा होणार आहे.