For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लालूंची नितीश कुमारांना पुन्हा ‘फ्रेंड रिक्वेस्ट’

05:45 PM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
लालूंची नितीश कुमारांना पुन्हा ‘फ्रेंड रिक्वेस्ट’
Advertisement

राजदचे दरवाजे नेहमी खुले असल्याचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. नितीश कुमार पुन्हा ‘इंडिया’त सामील होत असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे लालू यादव यांनी म्हटले आहे.  नितीश यांच्यावरून लालू यादवांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोघेही एकत्र येण्याचा कयास वर्तविला जात आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. नितीश कुमार हे स्वत:च्या खासदारांच्या दबावामुळे रालोआत सामील झाल्याचा दावा राजदच्या नेत्यांकडून केला जात आहे.  इंडिया आघाडीत संजदच्या वाट्याला फारशा जागा येणार नसल्याचे नितीश आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांना वाटू लागले होते.

नितीश कुमार यांच्यासाठी आमचा दरवाजा खुला आहे. नितीश कुमार आमच्यासोबत आले तर पुढील निर्णय घेऊ असे लालू यादवांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकारणात नवी चर्चा रंगू लागली आहे. विधानसभेत गुरुवारी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची भेट झाली होती. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारची कटूता दिसून आली नव्हती.

नितीश कुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडत 28 जानेवारी रोजी रालोआत सामील होत राज्यात सरकार स्थापन केले होते. महाआघाडी सोडल्यावर आणि नवे सरकार स्थापन केल्यावर नितीश हे पहिल्यांदाच लालूप्रसाद यादव यांना सामोरे गेले होते. यादरम्यान तेजस्वी यादवही या दोन्ही नेत्यांनजीक होते.

नितीश कुमार थकलेले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी भाग घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. आमचे मुख्यमंत्री कसे आहेत हे लोक ओळखून आहेत. जेव्हा ते भाजप सोडून आमच्यासोबत आले होते, तेव्हा मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे नितीश कुमार यावेळी भाजपसोबत जाणार नाहीत असे आम्हाला वाटले होते. परंतु नितीश कुमार हे पुन्हा पलटले आणि भाजपसोबत गेले. मुख्यमंत्री नितीश कुमार आता थकले आहेत  असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.