लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक
दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू : वेळप्रसंगी सिंगापूरला नेण्याची तयारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले असून वरि÷ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. तत्पूर्वी त्यांना पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीत आणण्यात आले.
गेल्या रविवारी लालू यादव पत्नी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी पायऱयांवरून पडले होते. या दुर्घटनेत त्यांच्या हातासह तीन ठिकाणी प्रॅक्चर झाले आहे. आधीच वृद्धापकालीन आजारांशी झुंजत असताना या नव्या दुखापतीमुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. लालू यादव दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. यादव कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांच्या फुफ्फुसात पाणी भरल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एम्समधील वैद्यकीय अधिकाऱयांच्या सल्ल्यानंतर त्यांना अधिक उपचारार्थ सिंगापूरला हलविण्याचा विचार केला जाणार आहे.
राबडीदेवींनी केले भावनिक आवाहन
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी लोकांना भावनिक आवाहन केले आहे. कोणीही नाराज होऊ नका, काळजी करण्यासारखे काही नाही. आरजेडी अध्यक्ष आता सावरत आहेत. तरीही आपण सर्वांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते-समर्थकांना केले आहे.