ST Mahamandal: आद्मापूर अमावस्या यात्रेतून लालपरीला तब्बल 1 कोटींचे उत्पन्न
वर्षभरातील आठ अमावस्या यात्रांमधून ही कमाई झाली आहे
कोल्हापूर : श्री क्षेत्र आद्मापूर येथे दर महिन्याला भरविण्यात येणाऱ्या अमावास्या यात्रेतून कोल्हापूर विभागातील राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) तब्बल 1 कोटी 29 लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वर्षभरातील आठ अमावस्या यात्रांमधून ही कमाई झाली आहे.
संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी प्रत्येक महिन्याला आदमापूर येथे प्रचंड गर्दी होते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने येतात. अमावस्येच्या आदल्या दिवशी व मुख्य दिवशीच लाखो भाविक दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतात. यामुळे आदमापूर यात्रा दिवसेंदिवस अधिक भव्य होत चालली आहे.
खासगी वाहनधारकांनाही फायदा यात्रेच्या काळात केवळ एसटीच नव्हे, तर रेल्वे आणि खासगी वाहनधारकांनाही मोठा आर्थिक लाभ होतो. दर्शनासाठी येणारे भाविक थोडा वेळ थांबून लगेच परतीचा प्रवास करतात. त्यामुळे खासगी जीप, टॅक्सी आणि बसेस यांनाही मागणी निर्माण होते.
कोल्हापूर, निपाणीतून नियमित फेऱ्यांची सुविधा यात्रा काळाव्यतिरिक्तही एसटीकडून नियमित प्रवासाची सोय उपलब्ध आहे. कोल्हापूर ते आदमापूर मुरगूड मार्गावर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दररोज 50 फेऱ्या (ये-जा) सुरू आहेत. तसेच निपाणी-आदमापूर मार्गावर दर 30 मिनिटांनी बसफेऱ्या उपलब्ध आहेत. या सेवेमुळे प्रवाशांना सोयीस्कर व परवडणारा प्रवास मिळतो आणि त्याचा फायदा आर्थिक दृष्ट्याही एसटीला होत आहे.
महिलांसाठी व ज्येष्ठांसाठी सवलत एसटी महामंडळाने भाविकांसाठी विशेष सवलतींची सुविधा ठेवली आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तिकीट सवलत 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा या निर्णयामुळे भाविकांचा ओघ वाढला असून, गेल्या काही वर्षांत एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. एसटीचा निर्धार भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत सेवा देणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे.
पुढील अमावास्या यात्रांमध्येही ही सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाकडून करण्यात आले आहे.
जादा बसेस आणि सुरक्षित प्रवास
भाविकांच्या सोयीसाठी एसटीने यात्रा काळात विशेष व्यवस्था केली होती. सलग दोन दिवस रोज सरासरी 40 जादा बसेस सोडण्यात आल्या. वर्षभरात झालेल्या या यात्रांदरम्यान 4 हजार फेऱ्या पूर्ण करताना 2 लाख 25 हजार 500 प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला. प्रवासात सुरक्षितता व सोयीमुळे भाविकांचा विश्वास एसटीवर अधिक दृढ झाला आहे.