ललित मोदीला ‘वानूआतू’चा झटका
पासपोर्ट रद्द करण्याचा पंतप्रधान जोथाम नपत यांचा आदेश
वृत्तसंस्था / पोर्ट विला
मोठा भ्रष्टाचार करुन भारतातून पळालेल्या आणि ‘वानूआतू’ या छोट्या देशाच्या आसऱ्याला गेलेल्या ललित मोदी याला याच देशाच्या प्रशासनाने झटका दिला आहे. या देशाचे पंतप्रधान जोथाम नपत यांनी ललित मोदी याला दिलेला पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश आपल्या सरकारला दिला आहे. ललित मोदी आपले प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात येत आहे, असे या देशाच्या प्रशासनाने स्पष्ट केल्याने त्याची मोठी कोंडी झाली आहे.
काही वर्षांपूर्वी ललित मोदी हा भारताच्या आयपीएल या क्रिकेट संस्थेचा अध्यक्ष होता. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात त्याने शेकडो कोटी रुपये बेकायदेशीर मार्गाने कमावले असा आरोप त्याच्यावर भारताच्या विविध तपास संस्थांनी केला आहे. चौकशी टाळण्यासाठी त्याने प्रथम लंडन येथे पलायन केले. नंतर वानूआतू या छोट्या देशाचा आसरा घेतला. या देशात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तथापि, या देशाच्या प्रशासनाने त्याला दाद दिली नाही, असे दिसून येत आहे. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
नीरव मोदीचाही अर्ज फेटाळला
भारतीय बँकांना शेकडो कोटी रुपयांचा चुना लावून भारतातून पळालेला कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदीनेही याच देशात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचाही पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश वानूआतूच्या प्रशासनाने यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळे सध्या नीरव मोदीचीही कोंडी झाली आहे. त्याच्यावर भारतात बँकांना लुबाडल्याचा आरोप असून त्याची ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास संस्थांच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे.
नागरिकत्वाचा अर्जही रद्द होणार...
ललित मोदी याने वानूआतू या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याने त्याचा नागरिकत्वाचा अर्जही प्रशासनाकडून नाकारण्यात येण्याची शक्यता आहे. नीरव मोदी यानेही या देशाचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ललित मोदी याचा नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यास तो भारताच्या हाती लागण्याची शक्यता वाढणार आहे. भारत सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे.