ललित सुवर्णपदकाच्या फेरीत
ग्रीको-रोमन प्रकारात भारताचे दोन मल्ल कांस्यपदकासाठी लढणार
वृत्तसंस्था, बिश्केक, कीर्गीझस्तान
येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या ललितने पुरुषांच्या 55 किलो गट ग्रीको-रोमन प्रकारात अंतिम फेरी गाठत सुवर्णपदकाजवळ झेप घेतली आहे तर अन्य दोन भारतीय मल्ल कांस्यपदकासाठी लढत देणार आहेत.
23 वर्षीय ललितने उपांत्य लढतीत चीनच्या हुओयिंग शि यांच्यावर पूर्ण वर्चस्व राखत 11-3 अशा गुणाफरकाने मोठा विजय मिळविला. मात्र अमन (77 किलो ग्रीको-रोमन) व माजी चॅम्पियन सुनील कुमार (87 किलो ग्रीको-रोमन) यांना उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली.
गेल्या महिन्यात ललितने मुहमेत मालो कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. येथे त्याची कांस्यपदकासाठी 2025 चा आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्यविजेता उझ्बेकचा इख्तियार बोटिरोव्ह याच्याशी लढत होईल. बोटिरोव्हने उपांत्य फेरीत स्थानिक खेळाडू उलान ऊलूचा 5-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
77 किलो गटाच्या ग्रीको-रोमन उपांत्य लढतीत अमनला इराणच्या अली ओस्कूकडून 3-13 असा मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत अमनने चीनच्या हलिशान बहेजियांगचा 4-1 असा पराभव केला होता. आता कांस्यपदकासाठी अमनची लढत दक्षिण कोरियाच्या येओनघुन नोहशी होईल. 2020 चा आशियाई चॅम्पियन सुनील कुमारला 87 किलो ग्रीको-रोमन लढतीत इराणच्या घोलामरेझा फरोखिसेन्जानीकडू 0-8 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.
65 किलो जी-आर लढतीत सनी कुमार पात्रता फेरीतच कझाकच्या सैफुल्ला कुरमानकडून पराभूत झाल्याने त्याला स्पर्धेबाहेर पडावे लागले. याशिवाय पुरुषांच्या 130 किलो ग्रीको-रोमन उपांत्यपूर्व लढतीत जोगिंदर राठी पराभूत झाल्याने त्याचे आव्हानही संपुष्टात आले.