लक्ष्य सेन विजयी, मालविका पराभूत
वृत्तसंस्था / कौलालंपूर
2026 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने विजयी सलामी दिली. मात्र महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडला पराभव पत्करावा लागला.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात लक्ष्य सेनने सिंगापूरच्या 21 व्या मानांकीत जिया हेंग जेसन तेहचा 21-16, 15-21, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. हा सामना 70 मिनिटे चालला होता. पुरूष टेनिसपटूंच्या मानांकनात लक्ष्य सेन सध्या 13 व्या स्थानावर आहे. त्याचा दुसऱ्या फेरीतील सामना फ्रान्सच्या पोपोव्ह किंवा हाँगकाँगच्या एयुशी होईल.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात थायलंडच्या सातव्या मानांकीत रत्चानोक इंटेनॉनने भारताच्या मालविका बनसोडचे आव्हान 21-11, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत पुरूष दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन भारताचे प्रतिनिधीत्व करतील.