लक्ष्य सेनचा पोपोव्हला पराभवाचा धक्का
मुथुसामी, श्रीयांशी, रक्षिता दुसऱ्या फेरीत, श्रीकांत पराभूत
वृत्तसंस्था/ सारब्रुकेन, जर्मनी
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने फ्रान्सच्या पाचव्या मानांकित ख्रिस्तो पोपोव्हला पराभवाचा धक्का देत येथे सुरू असलेल्या हायलो ओपन सुपर 500 स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 2021 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य मिळविलेल्या लक्ष्यने पोपोव्हवर 21-16, 22-20 अशी मात केली. लक्ष्यची पुढील लढत आपल्याच देशाच्या एस. संकन मुथुसामी सुब्रमण्यनशी होईल. मुथुसामीने मलेशियाच्या जुन हाओ लिआँगचा 21-14, 18-21, 21-16 असा पराभव केला. मात्र किदाम्बी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला भारताच्याच किरण जॉर्जने 21-19, 21-11 असे हरविले. जॉर्जची पुढील लढत आठव्या मानांकित टोमा ज्युनियर पोपोव्हशी होईल. ज्युनियर पोपोव्हने इंग्लंडच्या हॅरी हुआंगवर 21-17, 19-21, 21-19 अशी मात केली.
महिला विभागात भारताच्या बिगरमानांकित श्रीयांशी वालिशेट्टीने डेन्मार्कच्या तिसऱ्या मानांकित लिने होजमार्क काएर्सफेल्डचा 21-19, 21-12 असा केवळ 33 मिनिटांत पराभव केला. युवा खेळाडू रक्षिता संतोष रामराजनेही आगेकूच करताना स्पेनच्या क्लारा अझरमेन्डीवर 21-14, 21-16 अशी मात केली. वालिशेट्टी व रक्षिता यांची पुढील फेरीत एकमेकांविरुद्ध लढत होईल. अनमोल खर्बचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. संघर्षपूर्ण लढतीत तिला डेन्मार्कच्या आठव्या मानांकित ज्युली दावाल जेकब्सेनने 26-24, 23-21 असे हरविले.