थॉमस चषक स्पर्धेतून लक्ष्य सेन बाहेर
वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)
येथे सुरू असलेल्या 2026 च्या थॉमस आणि उबेर चषक सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने थॉमस चषक विभागात उपांत्य फेरी गाठली आहे. बलाढ्या चीन तैपेईचा पराभव करत भारताने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. आतापर्यंत भारतीय संघातील लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसेच सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांची कामगिरी दमदार झाली. भारताचा लक्ष्य सेन याला दुखापत झाल्याने तो आता फ्रान्सविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत खेळू शकणार नाही.
लक्ष्य सेनच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली असून त्या ठिकाणी बरीच सूज दिसून आली आहे. ही दुखापत बरी होण्यासाठी त्याला आता विश्रांती घ्यावी लागेल. आता फ्रान्सबरोबर होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीतील लक्ष्य सेनच्या जागी आयुष शेट्टीला फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हशी लढत द्यावी लागेल. तसेच किदांबी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या एकेरी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करतील. लक्ष्य सेनच्या या दुखापतीमुळे भारतीय संघामध्ये थोडे नैराश्य वातावरण निर्माण झाले. पण लक्ष्य सेनच्या गैरहजेरीत भारतीय संघ उपांत्य लढतीत दर्जेदार कामगिरी करेल असा विश्वास अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने व्यक्त केला आहे. चीन तैपेईविरुद्धच्या लढतीमध्ये एकेरी सामन्यात खेळताना लक्ष्य सेनच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला ही दुखापत झाली होती. आता या स्पर्धेत भारताचे किमान एक पदक निश्चित झाले आहे. 2022 साली भारताने थॉमस चषकावर आपले नाव कोरले होते. तर 1952, 1955 आणि 1979 साली या स्पर्धेत भारताने कांस्यपदके मिळविली होती.