For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्य रायचंदानीचे नाबाद द्विशतक

06:22 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्य रायचंदानीचे नाबाद द्विशतक
Advertisement

भारत युवा संघ प. डाव 8 बाद 430, ऑस्ट्रेलिया युवा संघावर 213 धावांची आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था, राजकोट

येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील वयोगटातील भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा संघातील पहिल्या कसोटीत सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान भारताने पहिल्या डावात 8 बाद 430 धावांचा डोंगर उभा केला. सलामीचा फलंदाज लक्ष्य रायचंदानीने नाबाद द्विशतक (210) झळकविले. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 217 धावांत आटोपल्याने या सामन्यात भारतीय युवा संघाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. भारतीय युवा संघाने 213 धावांची आघाडी मिळविली आहे.

Advertisement

या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया युवा संघाचा पहिला डाव 86.5 षटकांत 217 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलिया संघातील ब्लोक कॅटलने शतक झळकविताना 198 चेंडूत 14 चौकारांसह 102 धावा जमविल्या. हॉलिकने 160 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावा केल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 147 धावांची शतकी भागिदारी केली. पण ही जोडी फुटल्यानंतर भारतीय युवा गोलंदाजांनी त्यांना केवळ 217 धावांवर रोखले. ब्रेनने 3 चौकारांसह नाबाद 25, निल पटेलने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 4 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. भारतीय युवा संघातर्फे इशान ओमने 53 धावांत 5 तर मोहित उल्वाने 37 धावांत 3 तसेच चौहानने 56 धावांत 2 गडी बाद केले.

भारतीय युवा संघाने बिनबाद 8 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. रायचंदानी 256 चेंडूत 4 षटकार आणि 20 चौकारांसह 210 धावांवर तो खेळत आहे. कर्णधार चौहानने 81 चेंडूत 7 चौकारांसह 54 तसेच मानव कृष्णाने 2 चौकारांसह 25 आणि आक्रमने 2 षटकार व 1 चौकारासह 26 धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मोहित उल्वाने आक्रमक फटकेबाजी करताना 56 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 58 धावा झळकविल्या. रायचंदानी आणि उल्वा यांनी नवव्या गड्यासाठी अभेद्य 137 धावांची भागिदारी केली आहे. ऑस्ट्रेलिया युवा संघातर्फे बार्टनने 65 धावांत 3 तर सिंगॉस, ग्रेगरी यांनी प्रत्येकी 2 तर ब्रेनने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :  ऑस्ट्रेलिया यवा संघ प. डाव सर्वबाद 217 (कॅटल 102, हॉलिक 59, ब्रेन नाबाद 25, निल पटेल 11, अवांतर 12, इशान ओम 5-53, मोहित उल्वा 3-37, चौहान 2-56), भारत युवा संघ प. डाव 92 षटकांत 8 बाद 430 (लक्ष्य रायचंदानी खेळत आहे 210, मोहित उल्वा खेळत आहे 58, चौहान 54, मानव कृष्णा 25, आक्रम 26, ओझा 13, विर्क 11, अवांतर 25, बार्टन 3-65, सिंगोस, ग्रेगरी प्रत्येकी 2 बळी, ब्रेन 1-53).

Advertisement
Tags :

.