लक्ष्य, प्रणॉय, श्रीकांत, राजावत पराभूत, किरण विजयी
इंडोनेशिया सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा
वृत्तसंस्था /जकार्ता
येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन व किरण जॉर्ज यांनी दुसरी फेरी गाठली तर एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. मात्र गुरुवारी लक्ष्य सेन व प्रियांशू राजावत यांना पराभव स्वीकारावा लागल्याने ते स्पर्धेबाहेर पडले. जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणाऱ्या लक्ष्य सेनने मलेशिया ओपनमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करताना चीनच्या वेंग हाँग यांगला 24-22, 21-15 असा धक्का दिला. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला डेन्मार्कच्या आठव्या मानांकित अँडर्स अँटोनसेनने 21-19, 21-18 असे नमवित आगेकूच केली. प्रियांशू राजावतने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या रासमुस गेम्केला पराभवाचा धक्का दिला होता. पण दुसऱ्या फेरीत त्याला कॅनडाच्या ब्रायन यांगकडून 18-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
23 वर्षीय किरण जॉर्जने एका गेमची पिछाडी भरून काढत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हवर 18-21, 21-16, 21-19 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. पात्रता फेरीतही जॉर्जने दोन शानदार विजय नोंदवले होते. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱ्या एचएस प्रणॉयलाही पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंगापूरच्या लोह कीन यू याने त्याचा 18-21, 21-19, 10-21 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविणारा 31 वर्षीय प्रणॉय मलेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेतही पहिल्या फेरीत पराभूत झाला होता. माजी अग्रमानांकित श्रीकांतला पुन्हा एकदा रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. त्याला पहिल्याच फेरीत दहाव्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियाने 21-19, 14-21, 11-21 असे केवळ 54 मिनिटांत हरविले. पहिल्या फेरीत पराभूत होण्याची त्याची ही सलग दुसरी वेळ आहे.