लक्ष्य चहर, जस्मीनचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ बुस्टो अरसिझीओ (इटली)
येथे सरू असलेल्या पहिल्या विश्व ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा विद्यमान राष्ट्रीय विजेता लक्ष्य चहरचे तसेच महिलांच्या विभागात जस्मीन लंबोरिया यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
पुरूषांच्या 80 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत इराणच्या मेसामने लक्ष्य चहरचा पराभव केला. या लढतीत पहिल्या फेरीत मेसामने चहरवर 3-2 अशी मात केली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये लक्ष्यने मुसंडी मारत 3-2 असा विजय मिळविला होता. त्यानंतर या लढतीतील शेवटचे 20 सेकंद बाकी असताना मेसामने आपल्या जबरदस्त ठोशावर चहरचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या चारही मुष्टियोद्ध्यांना दुसरी फेरी गाठता आली नाही. 51 किलो गटात दीपक भोरियाला तसेच 92 किलो वरील गटात नरेंद्र बेरवालला तसेच महिलांच्या विभागात जस्मीन लंबोरियाला 60 किलो वजन गटात पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. या स्पर्धेमध्ये एकूण पुरूष विभागात 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी महोम्मद हुसामुद्दीन आणि शिवा थापा यांचे आव्हान अद्याप जीवंत आहे. थापाची सलामीची लढत उझबेकच्या अब्दुलेवशी होणार आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निखात झरीन, प्रीती पवार, परविन होडा आणि लवलिना बोर्गोहेन यांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे. यापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या 9 मुष्टियोद्ध्यांनी आपला सहभाग दर्शविला होता. इटलीतील स्पर्धेत महिलांच्या विभागात 60 किलो वजन गटात जपानच्या अयाका तेगुचीने लंबोरियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.