शहापूर, वडगाव परिसरात लक्ष्मीपूजन उत्साहात
फटाक्यांच्या आतषबाजीचा धुमधडाका
बेळगाव : परंपरेनुसार शहापूर व वडगाव परिसरामध्ये कार्तिक पौर्णिमेदिवशी लक्ष्मी पूजन करण्यात आले. यामुळे दुकाने, आस्थापनांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत धुमधडाक्यात लक्ष्मी पूजन करण्यात आले. यामुळे शहापूर व वडगावच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कपड्यांची दुकाने, किराणा मालाची दुकाने, सराफी पेढ्यांवर पुजेसाठीची धावपळ सकाळपासूनच दिसत होती. बेळगाव शहरात दिवाळीत लक्ष्मी पूजनादिवशीच पूजा केली जाते. परंतु शहापूर, वडगाव भागात कार्तिक पौर्णिमेदिवशी पूजा होते. सर्वच दुकानात पूजा असल्यामुळे पौरोहित्य करण्यासाठी भटजींची आवश्यकता भासत होती. परंतु वेळेत पोहोचण्यासाठी भटजींची तारेवरची कसरत सुरू होती. सायंकाळी 6 नंतर खडेबाजार शहापूर तसेच वडगावच्या रस्त्यांवर गर्दीने रस्ते फुलले होते. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू होता. शहापूर प्रमाणेच बेळगावमधील काही दुकानांमध्ये सुद्धा शुक्रवारी लक्ष्मीपूजन करण्यात आले. यानिमित्ताने सर्वत्र रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या पूजेसाठी आलेल्या निमंत्रितांमुळे रात्री उशिरापर्यंत शहरात गर्दीचा ओघ कायम होता.