शहापूर परिसरात भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन
दिवाळीची अनुभूती; तुळशी विवाहाचा समारोप
बेळगाव : शहापूर, वडगाव परिसरात बुधवारी (दि. 5) त्रिपुरारी पैर्णिमेचे औचित्य साधून लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात झाले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दोन दिवसांपासून निवासस्थाने, आस्थापनांतून तयारी सुरू होती. सायंकाळचा मुहूर्त साधत अनेकांनी लक्ष्मी-कुबेर पूजन केले. शहरात अश्विन अमावास्येला किंवा बलिप्रतिपदेला लक्ष्मी-कुबेर पूजन होत असते. शहापूर, वडगाव भागात कार्तिक पौर्णिमेला पूजन करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शहापूर, वडगाव बाजारपेठेत बुधवारी गर्दी दिसून येत होती.
ऊस, झेंडुंची फुले, चिरमुरे, बत्ताशे, पेढे, दूध यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. सायंकाळी निवासस्थाने-आस्थापनांसमोर सुबक रांगोळी,आवारात मंद तेवणाऱ्या पणत्या, निवास्थानांसमोर उंचीवर लटकलेले अकाशकंदील, मंत्र, स्तोत्र, आरत्यांची कानावर पडणारी सुरावट, फटाके, हुक्के यांची आतषबाजी, पुरोहितांच्या (भटजी) उपस्थितीत होणारी पूजा असे दिवाळीसारखे वातावरण परिसरात दिसून येत होते. निवासस्थाने व आस्थापनांना हितचिंतकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात ठिकठिकाणी पूजेची धूम सुरू होती. बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र उत्साहात पूजन झाले.
तुळशी विवाहाचा समारोप
तुळशी विवाहाला रविवारी (दि. 2) सुऊवात झाली. द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत आपल्या सोयीनुसार केव्हाही तुळशी विवाह करता येतो. शहापूर, वडगाव भागात अनेकांनी बुधवारी लक्ष्मीपूजनाबरोबर तुळशी विवाह केला.