कंग्राळी बुद्रकमध्ये लक्ष्मीदेवी भंडारा कार्यक्रम उत्साहात
1984 सालानंतर एप्रिल 2026 मध्ये यात्रा भरण्याची शक्यता : भंडारा मिरवणुकीला भाविकांची अमाप गर्दी : शेकडो भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
उदो गं आई उदो... श्री लक्ष्मी माता की जय... हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराज की जय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय...च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीचा व गावातील सर्व देवीदेवतांचा उत्कार घालणे व भंडारा कार्यक्रम शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने पार पडला. गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा पुढीलवर्षी एप्रिल 2026 मध्ये भरविण्याचे ठरविण्यात आले. या निमित्ताने सदर भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
1984 साली श्री लक्ष्मीदेवीची यात्रा भरविण्यात आली होती. यात्रा भरविण्यासंदर्भात देवस्थान पंचकमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांची श्री लक्ष्मीदेवी मंदिरासमोर मागील दोन महिन्यापूर्वी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पुढील वर्षी एप्रिल 2026 मध्ये यात्रा भरविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. जवळजवळ 41 वर्षांनी गावचे ग्रामदैवत लक्ष्मीदेवीची यात्रा साजरी करण्याचा योग आल्यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. शुक्रवारी भंडारा पूजाविधी कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी मंदिरमध्ये प्रारंभी देवस्थान पंचकमिटीच्या हस्ते लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर गावातील सर्व देवदेवतांची नावे घेऊन गाव समृद्ध ठेवणे, धनधान्यांनी भरू दे, सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना करत गाऱ्हाणे घालण्यात आले. यानंतर भंडारा कार्यक्रमाच्या उपस्थित गावातील श्री यल्लम्मादेवी भक्त महिलांकडून लक्ष्मीदेवीला उत्कार घालण्यात आला.
भंडाऱ्याची उधळण
सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी देवीच्या मंदिरापासून भक्तीपूर्ण भंडारा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणूक हनुमान मंदिरजवळ आल्यावर हनुमान देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज, गावचे जागृत ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवस्थान आदी देवस्थानांना उत्कार घालून मिरवणूक चव्हाट गल्लीतून ढोल-ताशांच्या निनादात लक्ष्मीदेवी गदगेचे ठिकाण येथे मिरवणूक आली. या ठिकाणी देवस्थान पंच मारुती रा. पाटील व लक्ष्मीदेवीचे पुजारी रामा सुतार यांच्या हस्ते सपत्नीक गदगेच्या चबुतऱ्याची विधिवत पूजा करण्यात आली. या ठिकाणी भटजींच्या हस्ते विधिवत मंत्रपठण करण्यात आले. या ठिकाणी श्री यल्लम्मादेवी भक्त महिलांच्या हस्ते उत्कार घालण्यात आला. यावेळी आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंचकमिटी, ग्रामपंचायत, युवक मंडळे, महिला मंडळे व ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे समालोचन प्रशांत पवार व शंकर पाटील यांनी केले.
यात्रा 2027 ला होण्याची शक्यता?
श्री महालक्ष्मी देवीची यात्रा केव्हा होणार, याबाबत अद्याप सध्या स्पष्टीकरण झाले नाही. त्यामुळे सध्या प्रश्नचिन्ह आहे. काही ग्रामस्थ 2026 तर काही ग्रामस्थ 2027 ला यात्रा करूया म्हणून चर्चा सुरू आहे. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये देवस्थान पंचकमिटी गावामध्ये बैठक बोलवणार असून या बैठकीमध्ये यात्रा 2026 ला की 2027 ला करायची, याबाबत चर्चा होणार असून या बैठकीमध्ये कोणत्या साली यात्रा भरवायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.