लक्ष अकादमीचा 90 धावांनी विजय
केएससीए 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष क्रिकेट अकादमी ब ने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब चा 90 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. अथर्व माने याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ऑटोनगर येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष क्रिकेट अकादमी ब ने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात सर्वगडी बाद 192 धावा केल्या. त्यात अथर्व मानेने 1 षटकार 11 चौकारासह 77, गगन नोलीने 6 चौकारासह 31, मोहम्मद मकानदारने 3 चौकारासह 30, प्रितम कामतने 3 चौकारासह 22 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे आयुष आजगावकरने 20 धावांत 2, ओम बानीने 33 धावांत 2 तर अवनिश बसुर्तेकर, मयुर जाधव, द्रिशा रायकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा डाव 32.1 षटकात 103 धावांत आटोपला. त्यात मयुर जाधवने 5 चौकारासह 31, द्रिशा रायकरने 2 चौकारासह 20 धावा केल्या. या व्यक्तीतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. लक्ष अकादमीतर्फे जकवान पटेलने 19-3, राजवीर के.ने 25-3, प्रितम कामतेने 28-3 तर समर्थ के.ने 1 गडी बाद केला.