बनावट कागदपत्रांद्वारे लाखो चौ.मी. जमीन घशात!
आसगावातील प्रकार : आमदार अॅड. कार्लोस फरेरा यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यभरात विशेषत: बार्देश तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळे झालेले आहेत. असगाव येथील सर्व्हे क्र. 101/1 ही 2 लाख 222 हजार चौरस मीटर जमीन बनावट कागदपत्रे तयार करून आपल्या घशात घातल्याचे उघड झाले आहे, असा गौप्यस्फोट हळदोणेचे आमदार कार्लोस फरेरा यांनी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
सदर घोटाळयात पंचसदस्य सुदेश पार्सेकर व सुप्रिया पार्सेकर यांचा सहभाग आहे. तसेच एक माजी मंत्री व त्याचा मुलगा, तसेच एक वकील व नगरनियोजन खात्यातील काही अधिकारीही यामध्ये गुंतले असल्याचा आरोपही आमदार फरेरा यांनी यावेळी केला. राज्यात अशा जमीन घोटाळे करण्यासाठी वकील व दलाल यांचे रॅकेट सक्रिय असल्याचेही म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, कळंगुट गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरिया, आरटीआय कार्यकर्ते राजेंद्र घाटे यांची उपस्थिती होती.
कोमुनिदादकडे नोंद नसल्याचे स्पष्ट!
आमदार फरेरा पुढे म्हणाले, पार्सेकर यांनी कोमुनिदादने आपल्याला 1948 साली जमीन दिल्याचा दावा केला आहे. मात्र सदर कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे माहिती हक्काद्वारे समोर आले आहे. जमीन व्यवहाराबाबत कोमुनिदादाला नोटीस काढल्याचा दिखावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात नोटीस बजावल्याची नेंद रजिस्टरमध्ये नाही. प्रशासकाने नोटीस काढल्यानंतर म्युटेशनसाठी फाईल प्रस्तावित केली. त्यानंतर म्युटेशन करून वरील दोघांची नावे नोंद केली आहेत. 1950 साली सेलडीड दाखविले असून तेही बनावट आहे. त्या दोघांची नावे रजिस्टरला चढविण्यासाटी सुरुवातीपासूनच येथे बनवेगिरी करण्यात आल्याचा आरोप आमदार फरेरा यांनी केला.
1927 साली भूखंड विकला तर पुन्हा विक्रीस का काढला ?
1950 साली सेलडीड केले तर म्युटेशन करण्यास इतकी वर्षे का थांबलात. एवढी मोठी जागा तुमच्या नावे नसेल तर तुम्ही त्वरित याचा शोध घेणे आवश्यक होते. सदर जमिनी संदर्भात 2019 ते 2024 या काळात मोठा घोटाळा झाला हे स्पष्ट होते, असा आरोप फरेरा यांनी यावेळी केला. 1927 साली जर या भूखंडाची विक्री झाली असतानाही तो भूखंड पुन्हा विक्री कसा काय केला? यातून बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
सध्या गोव्यात वकील व दलालांचे रॅकेट कार्यरत असून मोक्याच्या ठिकाणच्या जमिनींवर त्यांचा डोळा आहे. अनेक जमिनी फुकटमध्ये लाटलेल्या आहेत. यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात आहे. यामध्ये यशवंत एम. सावंत हा इसम असा या घोटाळ्यात गुंतलेला आहे. तसेच भाजपचा माजी मंत्री, त्याचा मुलगा, वकील, स्थनिक पंच, नगरनियोजन व सर्व्हे खात्यातील अधिकाऱ्यांचाही या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप आमदार फरेरा यांनी यावेळी केला...............................................................