आपटेनगर येथील टाकीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया
एकीकडे पाण्याचा ठणठणाट तर दुसरीकडे उधळपट्टी : आपटेनगर ते सानेगुरूजी वसाहत मार्गावर पाणीच पाणी
नागरिकांच्या घरात शिरले पाणी : महापलिकेचा अजब कारभार
कोल्हापूर प्रतिनिधी
आपटेनगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीला गळती लागली असुन गेले दोन दिवस पाणी वाहुन चालले आहे. टाकीतून वाहणारे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. तर आपटेनगर ते सानेगुरूजी वसाहत मार्गावर पाण्याचे पाट वाहत आहेत. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाण्यासाठी धावाधाव दुसरीकडे गळतीतून वाया जाणारे लाखो लिटर पाणी, यामुळे महापालिकेच्या अजब काराभाराचा नमुना पाहायला मिळत आहे.
आपटे परिसरातील शेजारी प्रभागातील क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, फुलेवाडी रिंगरोड परिसर, आहिल्याबाई होळकर नगर, दत्त कॉलनी, निचिते नगर, न्यु कणेरकरनगर आदी भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तीन दिवस पाणीच आले नसल्याने नागरिक खासगी वाहनाने इतर ठिकाणाहून पाणी आणत आहेत. काहीजण पाणी विकत घेत आहेत. एकीकडे पाण्याचा ठणठणाट सुरू आहे तर दुसरीकडे गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. वापरण्यासाठी टाकी बंद केली असताना यामध्ये पाणी सोडले कसे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या घरात व दुकानात शिरले पाणी
गेल्या दोन दिवसांपासून टाकीतून पाणी गळती सुरू आहे. पाण्याचा प्रवाह एतका मोठा आहे, की परिसरातील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरले आहे. आपटेनगर प्रमुख मार्गावरून पाणी वाहत आहे. त्यातच थेट पाईप लाईनसाठी रस्ता खोदला आहे. याची माती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला असुन अतघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.