घटस्थापनेदिवशीच यल्लम्मा देवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा देवस्थानाला विशेष महत्त्व
वार्ताहर/बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुकादेवीच्या दर्शनाचा गुरुवारी नवरात्र उत्सवातील पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी लाभ घेतला. गुरुवारी सायंकाळी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, देवस्थान समितीचे अध्यक्ष बसाय्या हिरेमठ, मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश, नगराध्यक्ष केंचाव्वा हुच्चनावर, कोळप्पगौड गंदिगवाड, वाय. वाय. काळळप्पनावर, अल्लमप्रभू प्रभूनावर, नागरत्ना चोळी, अरविंद मळगे व पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना समारंभ पार पडला. गाभाऱ्यासमोर देवीला तेल अर्पण करण्यासाठी ठेवलेल्या दिव्यात मान्यवरांनी तेल अर्पण करून शुभारंभ केला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. दुपारी दर्शनासाठी गर्दी वाढली होती. नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा देवस्थानाला विशेष महत्त्व असून देवीची विविध स्वऊपात आरास करून विशेष पूजा बांधण्यात येते.