लाखो भाविकांनी घेतले तुरबतीचे दर्शन
निपाणी उरुसात भाविकांची अलोट गर्दी : भरउरुस मंगळवारी उत्साहात : कोट्यावधी रुपयांची उलाढाल
निपाणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणीतील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर गौसपाक दस्तगीरसाहेब यांचा भरउरुस मंगळवारी उत्साहात पार पडला. यावेळी दिवसभरात लाखो भाविकांनी तासन्तास रांगेत थांबून तुरबतीचे दर्शन घेतले. कंदुरीसाठीही दर्गाह आवार भाविकांनी फुलून गेला होता. सोमवारी गंधरात्र कार्यक्रमाने उरुसाला सुरुवात झाली. रात्री 12 नंतर भाविकांकडून दंडवत घालून तुरुबतीचे दर्शन घेण्यात आले. नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी दर्गाह मंडप परिसरात गर्दी केली होती. सोमवारी रात्रभर चव्हाणवाडा येथे गंध उगाळल्यानंतर मंगळवारी पहाटे चव्हाणवाड्यातून गंधाची मिरवणूक काढून तुरबतीस गंध अर्पण करण्यात आला. उरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांच्यासह श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, रणजित देसाई, संग्राम देसाई, पृथ्वीराज चव्हाण व श्रीमंत जयराम घोरपडे-नवलिहाळकर सरकार यांच्या हस्ते दर्गाह येथे गंधलेपन कार्यक्रम विधी झाला. रात्री जिजामाता चौकात फटाक्यांची आतषबाजी केली.
यानंतर 9.30 वाजता कव्वालीचा भव्य कार्यक्रम पार पडला. बुधवारी खारीक उदीच्या कार्यक्रमानंतर शिळा ऊरुस साजरा होणार आहे. मानाच्या व नवसाच्या कंदुरीसाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिह्यातील हजारो भाविक आले होते. दिवसभर चार चाकी व दुचाकी वाहनांची मोठी गर्दी दिसत होती. मंगळवारी भर ऊरुस पार पडल्यानंतर बुधवारी शिळा ऊरुस असल्याने सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत खारीक व उदीचा कार्यक्रम जिजामाता चौकातील चव्हाणवाडा येथे होणार आहे. गुरुवारी मानाच्या फकीरांची रवानगी व भंडारखाना कार्यक्रम होणार आहे. शनिवार 19 रोजी पाकाळणी कार्यक्रम होणार आहे. या दिवशी चव्हाण घराण्याचे वारसदार, मानकरी लवाजम्यासह दर्गाह देवस्थान आणि संत बाबा महाराज चव्हाण समाधीस अभिषेक, गोडा नैवेद्य दिल्यानंतर मानकरी रवानगी कार्यक्रम होतो. त्यानंतर उरुसाची सांगता होणार आहे. मंगळवारी भर उरुस पार पडला तरी यापुढे किमान दहा दिवस दुकाने, पाळणे राहणार आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून निपाणी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.