तहसीलदार कार्यालयाची लाखोंची थकबाकी
बिल भरण्यासाठी हेस्कॉमचा तगादा
बेळगाव : विद्युत बिल वसुलीसाठी घरगुती ग्राहकांना वारंवार तगादा लावला जातो. परंतु अनेक सरकारी कार्यालयांकडे हेस्कॉमची लाखो रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयाची तब्बल 1 लाख 84 हजार रुपयांची थकबाकी असल्याने बुधवारी वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे तहसीलदार कार्यालयाने यापैकी 77 हजार रुपये बिल भरण्याचे आश्वासन दिले आहे. घरगुती ग्राहकांचे एक हजार रुपये जरी वीज बिल थकले तरी कनेक्शन तोडले जाते. परंतु सरकारी कार्यालयांचे लाखो रुपयांचे वीज बिल थकले असूनही सहसा कारवाई होत नाही. बेळगाव मनपा थकबाकीमध्ये सर्वात आघाडीवर आहे.
याबरोबरच कॅन्टोन्मेंट बोर्ड, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग यांचीही थोड्या फरकाने थकबाकी आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीचे कोट्यावधी रुपयांचे वीज बिल थकले आहे. वारंवार सूचना करूनदेखील तहसीलदार कार्यालयाकडून बिल भरले जात नसल्याने अखेर बुधवारी सकाळी कनेक्शन तोडण्यात आले. सध्याच्या तहसीलदार कार्यालयात 4 मीटर तर जुन्या तहसीलदार कार्यालयात 2 मीटर आहेत. ऑक्टोबर अखेरपर्यंत 1 लाख 84 हजार रुपयांची थकबाकी होती. कनेक्शन तोडताच यापैकी काही रक्कम भरण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार काही मीटर बुधवारी तर काही मीटर गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आले. 77 हजार रुपयांचा धनादेश हेस्कॉमला जमा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे, परंतु शुक्रवारपर्यंत धनादेश जमा करण्यात आला नव्हता.
तहसीलदार कार्यालयावर नामुष्की
तहसीलदार कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. परंतु वेळेत बिल भरले जात नसल्याने कार्यालयाचे कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे तहसीलदार कार्यालयावर नामुष्की ओढवली. बिल भरण्यात आले नसल्याने कार्यालय दिवसभर अंधारात होते. यामुळे कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकांनाही अंधाराचा सामना करावा लागला.