राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी" योजना सुरू, लाभ घेण्याचे आवाहन
पिवळ्या, केसरी रेशनकार्ड धारकांच्या मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये
वारणानगर / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणेसाठी पूर्वीच्या माझी कन्या भाग्यश्री ऐवजी सुधारित "लेक लाडकी" हि नविन योजना राज्यात सुरु करण्यात आली असून याचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन पन्हाळा तालुक्याच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नयना पाटील यानी केले आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी
"लेक लाडकी " या नवीन योजनेत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे यासाठी मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे,शिक्षणास चालना देणे,मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे,कुपोषण कमी करणे,शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे अशी उद्दीष्टे ठेवल्याचे प्रकल्प अधिकारी नयना पाटील यानी सांगितले.
लेक लाडकी योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये,अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १ लाख १ हजार रुपये देण्याची तरतूद असल्याचे पाटील यानी सांगितले.
योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता,पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आणि बँक खाते आवश्यक असून लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे अशा अटी शर्ती असल्याचे प्रकल्प अधिकारी नयना पाटील यानी सांगितले.
सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी नयना पाटील यानी केले आहे.