For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापूर शिवारातील तलाव नियोजनाअभावी कोरडा

10:39 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहापूर शिवारातील तलाव नियोजनाअभावी कोरडा
Advertisement

तलावातील गाळ काढण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : पाणीसाठा वाढविण्याची गरज

Advertisement

बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्यावर असणारा ब्रिटिशकालीन शहापूर तलाव नियोजनाअभावी कोरडा पडला आहे. शहापूर, वडगाव, येळ्ळूर, धामणे या शिवाराला वरदान ठरलेल्या या तलावाची खोदाई करून गाळ न काढल्याने हा तलाव कुचकामी ठरत आहे. याचा परिणाम आजूबाजूच्या शेतीवर होत असून किमान यावर्षी तरी तलावातील गाळ काढल्यास पुढील वर्षी पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. एकूण 4 एकर 13 गुंठे अशा प्रशस्त जागेमध्ये तलावाची खोदाई करण्यात आली होती. परंतु, या तलावामध्ये अधिक प्रमाणात गाळ असल्याने पाण्याची क्षमता कमी होती. प्रशासनानेही दुर्लक्ष केल्यामुळे हा तलाव केवळ पावसाळ्याच्या दिवसातच पाण्याने भरलेला असतो. 2006 साली या तलावातील गाळ काढण्यात आला होता. त्यानंतर मात्र भूजल पातळी वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

यंदा डिसेंबरमध्येच पाणीसाठा कमी झाल्याने पिकांना फटका

Advertisement

परिसरात सुपीक जमीन असल्याने चांगल्या दर्जाचे पीक येते. तलावामध्ये पाणीसाठा राहिल्यास उन्हाळी शेती करणेही सोयीचे ठरू शकते. परंतु, गाळ काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मे 2023 मध्ये गाळ काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पावसाला सुरुवात झाल्याने हे काम मध्येच थांबविण्यात आले. यावर्षी डिसेंबर महिन्यातच तलावाचे पाणी आटल्याने काकडी, खरबूज, वांगी, दोडकी या पिकांना पाणी नसल्याने फटका बसला. दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा फटका बसत असल्याने किमान यावर्षी तरी तलावाची खोदाई झाल्यास आसपासच्या शेकडो एकर शेतीला तलाव वरदान ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी खोदाई करणे गरजेचे आहे.

यावर्षी तरी तलावाची खोदाई करा

शहापूर शिवारातील तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या शिवाराचा फायदा वडगाव, येळ्ळूर, धामणे येथील शेकडो एकर शेतीला होणार आहे. परंतु, योग्य प्रकारे तलावाची खोदाई केली जात नसल्याने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी तलावाची खोदाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

- राजू मरवे (शेतकरी संघटना पदाधिकारी)

Advertisement
Tags :

.