For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्वालामुखी विस्फोटामुळे निर्मित हेवन लेक

06:38 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्वालामुखी विस्फोटामुळे निर्मित हेवन लेक
Advertisement

चीनमधील सर्वात खोल सरोवर

Advertisement

जगात अशी अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत, ज्याविषयी लोकांना फारशी कल्पना नसते. अशा ठिकाणांसंबंधी अद्याप मोठ्या प्रमाणात संशोधन केले जाणे शिल्लक आहे. अशाचप्रकारे चीनमधील हेवन लेक स्वत:मध्ये अनेक रहस्यं सामावून आहे. चीन अन् उत्तर कोरियाच्या सीमेवरील हे अत्यंत सुंदर क्रेटर लेक आहे. हे माउंट चांबाईशान ज्वालामुखच्या अत्यंत वरच्या भागामध्ये स्थित आहे. हे सरोवर मागील 26 लाख वर्षांमध्ये झालेल्या अनेक विस्फोटांनंतर निर्माण झाले होते. युनेस्कोनुसार हे उत्तरपूर्व आशियातील सर्वात उंच आणि मोठे क्रेटर लेक आहे. हेवन हे चीनमधील सर्वात खोल सरोवर देखील आहे. हे सरोवर जवळपास 7200 फुटांच्या उंचीवर आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 9.2 चौरस किलोमीटर आहे. या सरोवराची कमाल खोली 1224 फूट नोंद झाली आहे. हेवन सरोवराला चीनमध्ये तियांची नावाने ओळखले जाते. हे सरोवर माउंट चांबाईशानच्या 16 शिखरांनी पूर्णपणे वेढलेले आहे.

रहस्यमय सरोवर

Advertisement

हे सरोवर एक काल्डेरामध्ये निर्माण झालेले असून ते जुन्या ज्वालामुखी विस्फोटांमुळे अस्तित्वात आले होते. यात सर्वात मोठा विस्फोट ईसवी सन 946 साली झाला होता. याला ‘मिलेनियम इरप्शन’ म्हटले जाते आणि हा आधुनिक इतिहासातील सर्वात मोठ्या विस्फोटांपैकी एक आहे. प्रागैतिहासिक काळात तियनावेनफेंग विस्फोटानंतर या पर्वताच्या शिखरावर पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती.

जियोथर्मल सिस्टीम

ही घटना 70 हजार वर्षांपूर्वी झाली होती असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. तेव्हापासून हेवन लेकचे पाणी अनेकदा खाली झाले आणि पुन्हा भरून गेले. असे पाऊस अन् बर्फ वितळल्यामुळे घडते. याचबरोबर ज्वालामुखीखाली एक सक्रीय जियोथर्मल सिस्टीम देखील अस्तित्वात आहे. ही सिस्टीम फॉल्ट लाइनच्या माध्यमातून पाण्याला अत्यंत वेगाने वर ढकलते.

सरोवरावरून अनेक दावे

2000 च्या दशकाच्या प्रारंभी या सरोवरावरून अनेक मोठे दावे करण्यात आले होते. या पाण्यात एक अजब प्राणी राहतो, या जीवाचे शीर घोड्याच्या आकाराचे असल्याचा दावा लोकांचा होता. परंतु वैज्ञानिकांनी या दाव्यांवर नेहमीच संशय व्यक्त केला आहे. हेवन लेक सारख्या ठिकाणी मोठा जीव जिवंत राहणे जवळपास अशक्य असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. युनेस्कोनुसार माउंट चांगबाईशान जगातील सर्वात चांगल्या संरक्षित स्ट्रॅटोवोल्केनोपैकी एक आहे. याला ‘ओपन एअर क्लासरुम’ देखील म्हटले जाते, कारण येथे अनेक विस्फोटांनंतर वेगवेगळ्या टप्प्यातील तपशील उपलब्ध आहे.

उत्तर कोरिया अन् चीनमध्ये वाद

उत्तर कोरियामध्ये माउंट चांगबाईशानला माउंट पेक्टू नावाने देखील ओळखले जाते. याचा अर्थ पांढरे शिखर असलेले पर्वत असा होतो. तर याच्या चिनी नावाचा अर्थ नेहमी पांढरा राहणारा पर्वत आहे. भूतकाळात या ज्वालामुखीवरून चीन आणि उत्तर तसेच दक्षिण कोरियादरम्यान वाद झाले आहेत. हा पर्वत या तिन्ही देशांसाठी सांस्कृतिक आणि भूराजकीय महत्त्व बाळगतो. 1962 आणि 1964 साली चीन आणि दक्षिण कोरियादरम्यान दोन सीमा करार झाले होते. या करारांनी ज्वालामुखी आणि हेवन लेकला जवळपास मध्यभागापासून विभागले होते. यात उत्तर कोरियाला सरोवराचा जवळपास 54.5 टक्के हिस्सा मिळाला होता. नंतर चीनने या भागाचा विकास सुरु केला. चीनने देशाच्या उर्वरित हिस्स्यांना याच्याशी जोडण्यासाठी विमानतळ अन् रेल्वेमार्गही सुरू केला.

Advertisement
Tags :

.