तैवानच्या अध्यक्षपदी लाय चिंग-ते
पुन्हा चीनविरोधी पक्षाचा निवडणुकीत विजय, अमेरिकेकडून सर्वांना शांततेचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तैवानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निर्णय झाला असून सत्ताधारी डेमॉव्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे लाय चिंग-ते यांची देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शनिवारी संध्याकाळी हा निर्णय घोषित झाला आहे. तैवानच्या जनतेने दिलेला हा कौल चीनसाठी धक्कादायक मानला जात आहे. निर्णय घोषित होण्यापूर्वीच चीनच्या दोन युद्धनौका तैवाननजीक आल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सर्व संबंधितांना जनतेचा कौल मान्य करण्याचे आणि शांततेचे आवाहन केले आहे.
डेमॉव्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचा हा सलग तिसरा विजय आहे. या पक्षाने 2016 आणि 2020 मध्येही निवडणूक जिंकली होती. आता 2024 मध्येही तो विजयी झाला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ते हे आता विद्यमान अध्यक्षा त्साई इंग-वेन यांचे स्थान घेणार आहेत. या पक्षाच्या विजयावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे.
तीच धोरणे पुढे चालविणार
मावळत्या अध्यक्षा वेन यांनी चीनच्या आक्रमकणाला विरोध करण्याचे आणि तैवानचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याचे धोरण स्वीकारले होते. ते त्यांनी गेली आठ वर्षे नेटाने आणि निष्ठेने सांभाळले होते. त्यामुळे चीन या क्षेत्रात फारशी हालचाल करु शकला नव्हता. ते यांनीही निवडून आल्यानंतर हीच धोरणे पुढे चालविण्याची घोषणा केली असून मानवाधिकार आणि मुक्ततेचा पुरस्कार केला आहे.
निवडणुकीनंतर त्वरित निर्णय
तैवानच्या प्रमाणवेळेनुसार शनिवारी दुपारी चार वाजता मतदान संपले होते. त्यानंतर त्वरित मतगणनेला प्रारंभ करण्यात आला. तेथील वेळेनुसार रात्री 10 वाजता मतगणना बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली होती आणि सत्ताधारी पक्ष पुन्हा विजयी होणार हे निश्चित झाले होते. सत्ताधारी पक्षाला एकंदर मतदानाच्या 56 टक्के मते पडल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. सविस्तर निर्णय रविवारी सकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक चुरशीची झाली होती.
चीनने केली होती टीका
चीनने लाई-ते यांच्यावर ते अध्यक्षदाचे उमेदवार झाल्यानंतर तीव्र टीका केली होती. लाई-ते हे प्रखर फुटीरतावादी आहेत, असे चीनचे म्हणणे आहे. त्यांच्या विरोधात चीनने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला अघोषित पाठिंबा दिला होता. ते यांच्या निवडीने पुन्हा चीन अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संरक्षण व्यवस्था सबळ करणार
सध्याची जागतिक परिस्थिती आणि तैवानला असणारा धोका पाहता संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक स्वयंपूर्णता आणण्याच्या दिशेने तैवान आपल्या नेतृत्वात अग्रेसर राहील, अशी घोषणा ते यांनी केली आहे. तैवानने शस्त्रसज्ज राहणे हे त्याच्या आणि या परिसराच्या हितासाठी आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
शांततेसाठी सामर्थ्य
चीनसंबंधीच्या भूमिकेत ते यांनी काहीसा मवाळपणा आणला आहे, अशीही चर्चा होत आहे. मात्र, तैवानच्या स्वातंत्र्याविषयी ते ठाम आहेत. चीनशी शांतता चर्चा करण्याची त्यांची तयारी आहे. पण ही चर्चा समान पातळीवर करण्यासाठी ते आग्रही आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या या भूमिकेला चीन कसा प्रतिसाद देणार, यावर पुढच्या बाबी अवलंबून असल्याची चर्चा आहे.
चीनशी तणाव अधिक वाढणार ?
ते यांची अध्यक्षपदी समाधानकारक बहुमताने निवड झाल्याने आता तैवानचे चीनशी संबंध अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. आपण ‘बनावट शांतते’च्या जाळ्यात अडकणार नाही, असे ते यांनी आधीच स्पष्ट केले असल्याने चीन त्यांच्याशी कोठपर्यंत जुळवून घेईल, हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे. मात्र, तैवान आणि चीन यांच्या संबंधांसाठी हा आव्हानात्मक काळ असल्याचे स्पष्ट होत आहे. तैवान हा आपलाच भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. त्यामुळे तैवानचे चीनशी संमिलीकरण अनिवार्य असल्याचे वक्तव्य चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी अनेकदा केले आहे. मात्र, तैवानच्या बहुसंख्य जनतेला चीनशी संमिलीकरण मान्य नाही असे या आता दिसून येत आहे.
अमेरिकेची चीन, तैवानशी चर्चा
या निवडणुकीचा कल स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी चीनच्या आणि तैवानच्या वरीष्ठ नेत्यांची चर्चा केली आहे. तणाव कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असून सर्वांनी जनतेने दिलेला कौल मान्य करावा, ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच शांततेचे आवाहनही त्यांनी केले.
निर्णयावर चीन नाराज
ड तैवानच्या निवडणुकीत स्वातंत्र्यवादी डेमॉव्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचा विजय
ड या देशाच्या अध्यक्षपदी लाई चिंग-ते यांची निवड होणार हे आता स्पष्ट
ड त्यांच्या विजयामुळे चीनशी संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण होणे शक्य
ड तैवान संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्यासाठीचे धोरण यापुढही ठेवणार