लाडू प्रसाद भेसळ चौकशी थांबली
वृत्तसंस्था / विजयवाडा
तिरुपती लाडू प्रसाद भेसळ प्रकरणी चौकशी काहीकाळ थांबविण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश सोमवारी केलेल्या सुनावणीनंतर दिला होता. त्यानुसार न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत चौकशी पुढे चालविली जाणार नाही, अशी घोषणा आंध्र प्रदेश सरकारने केली आहे.
भगवान व्यंकटेश्वराच्या लाडू प्रसादात गाय, डुक्कर आदी प्राण्यांच्या चरबीची भेसळ करण्यात आली आहे, असा अहवाल देशातील चार प्रयोगशाळांनी काही दिवसांपूर्वी पाठविला होता. नंतर या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागच्या वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात ही भेसळ झाली, असा आरोप केला होता. मात्र, तो माजी मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांनी फेटाळला होता. त्यानंतर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. चौकशी पूर्ण होण्याआधीच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप करणे अयोग्य होते, अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली होती.
विशेष दलाची स्थापना
प्रसाद लाडूंमधील भेसळीची चौकशी करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी एक विशेष अन्वेषण दलाची स्थापन केले होते. या दलाने चौकशीला प्रारंभ केला होता. तथापि, न्यायालयाने ही चौकशी पुढील आदेशापर्यंत थांबविली जावी, असा आदेश दिल्याने चौकशी आता थांबविण्यात आली आहे.