Eknath Shinde On Ladki Bahin Yojna | लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आळते पंचक्रोशीत भगवी लाट; शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन
हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील महायुतीच्या उमेदवारांच्या विजय संकल्प मेळावा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून देण्याची जबाबदारी नेत्यांची व आपल्या सर्वांची आहे. मी मुख्यमंत्री असताना विविध योजना राबविल्या त्यामध्ये माजी लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, लेक लाडकी लखपती योजनेसह अनेक योजनांचा समावेश आहे.
योजनांसाठीवर्षाकाठी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्ची पडली जाते. ती देण्यासाठी धाडस, हिम्मत, संवेदना व धाडस लागते. अरुणराव इंगवले व अजिंक्य इंगवले यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. जनतेसाठी त्यांनी मागितलेल्या मागण्यांसाठी एकनाथ शिंदे निधी कधीच कमी पडू देणार नाही. असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला. खासदार धैर्यशिल माने म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर्शनासाठी व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या विजयासाठी आळते पंचक्रोशीत भगवी लाट उसळली आहे. एकनाथ शिंदे पहाडासारखे पाठीशी राहिल्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता दुसऱ्यांदा खासदार होऊ शकला. त्यांचे आशीर्वाद असेच आपल्या मतदार संघावर राहोत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इंगवले पितापुत्र शिवसेनेच्या प्रवाहामध्ये समर्पित भावनेने सामील झालेले आहेत. अरुणराव इंगवले यांना जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी फसवल्याने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. मात्र यापुढे एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इंगवले यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. आणि आता शिवसेनेत प्रवेश केला असला तरी आगीतून उठून फोफाट्यात पडलो असे वाटायला नको अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रकाश मेळाव्यास पालकमंत्री आबिटकर, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हासदादा पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर), शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने,महिला जिल्हा आघाडी प्रमुख वैशाली डोंगरे, जिल्हा परिषदेच्या उमेदवार डॉ. वर्षा अविनाश सावर्डेकर, पंचायत समितीचे उमेदवार संतोष कांबळे व रोहिणी देसाई यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील नेते कार्यकर्ते व लाडक्या बहिणी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी केले तर आभार शितल हावळे यांनी मानले.